पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेनं मुंबई तुंबून दाखवली, धनंजय मुंडेंचा टोला

धनंजय मुंडे

दोन दिवसांच्या पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ठप्प झाली आहे. चार दिवसांत ४० लोकांचे जीव जातात. रस्त्यावर पाणी तुंबलय,  लोकांच्या घरात पाणी शिरलंय, रेल्वे बंद आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनवताना मुंबईकरांचे हाल केले जात असून मुंबईच्या या बिघडलेल्या परिस्थितीत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

करुन दाखविले म्हणणाऱ्यांच्या मातोश्री घराबाहेर पाणी साचले आहे, यांनी करुन नाही दाखवले तर मुंबईला भरुन दाखवले आहे. मुंबई तुंबली असताना फक्त पाणी साचले म्हणणाऱ्या मुंबईच्या महापौरांचाही त्यांनी समाचार घेतला.

सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस, शिवसेनेला 'धुतले'

मुंबईच्या मालाड भागात १६ हून अधिक जणांचा झालेला मृत्यू व पावसामुळे मुंबई, पुणे, ठाणेसह राज्याच्या विविध भागात ठप्प झालेल्या जनजीवनासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अन्वये उपस्थित तातडीच्या चर्चेत बोलतांना धनंजय मुंडे यांनी मुंबईमध्ये चालू वर्षी नालेसफाईवर केलेले २०० कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले असा सवाल केला. 

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ च्या घटनेनंतर पर्जन्य जलवाहिन्यांवर हजारो कोटी खर्च करण्यात आले. तरीही या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. नाले सफाईवर गेल्या १० वर्षात ३ ते ४ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. कुठे जातात हे पैसे, असा प्रश्न उपस्थित करतानाच महापालिकेतील सत्ताधारी आणि पहारेकऱ्यांनी मुंबापुरीची तुंबापुरी केली असल्याचा टोला लगावला.

आता राजकारण नव्हे मदत करण्याची गरजः आदित्य ठाकरे

महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण मागील चार वर्षापासून करीत असताना सरकार चौकशीला का घाबरते, असा प्रश्न उपस्थित करतानाच मुंबई पालिका ही निवडणूकीची संस्था आहे, असा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन असल्यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात असल्याचे ते म्हणाले.  

मालाडच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपये मदत देण्याची तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवली. मात्र अशी तत्परता घटना घडू नयेत यासाठी दाखवायला हवी होती असे ते म्हणाले. 

मुंबईत महिन्याचा पाऊस चार तासांतः मुख्यमंत्री फडणवीस

पुण्याच्या कोंढवा भागात भिंत कोसळून १६ जणांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेसंदर्भात बोलताना केवळ सरकारी मदत देऊन गुन्हा दाखल करुन सरकारला आपली सोडवणूक करता येणार नाही असे ते म्हणाले.

आज कधी, कुठली भिंत कोसळेल ? किती जणांचा जीव जाईल ? याची भिती मुंबई आणि राज्यात कच्च्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसांच्या मनात निर्माण झाली असून सरकारचे मुंबई आणि शहरांबद्दल अनास्थेचे जे धोरण आहे त्यामुळेच त्यांच्या जिवावर सरकारने मृत्यूची टांगती तलवार उभी केली असल्याचे मुंडे म्हणाले.