पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शस्त्रक्रियेने तब्बल २१४ किलो वजन कमी केले, मुंबईतील महिलेचा दावा

शस्त्रक्रियेने वजन कमी केले

शस्त्रक्रियेच्या (bariatric surgeries) माध्यमातून आपण आपले वजन ३०० किलोंहून ८६ किलोपर्यंत कमी केले असल्याचा दावा वसईमध्ये राहणाऱ्या एका ४६ वर्षांच्या महिलेने केला आहे. अमिता रजनी असे या महिलेचे नाव आहे. पण तिने केलेल्या दाव्याला या क्षेत्रातील जाणकारांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
अमिता आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियांबद्दल माहिती दिली. या संदर्भात अमिताची आई ममता म्हणाल्या, जेव्हा अमिताचा जन्म झाला त्यावेळी तिचे वजन व्यवस्थित होते. पण नंतर ते हळूहळू वाढू लागले. जेव्हा ती सहा वर्षांची झाली, त्यावेळी तिचे वजन जास्त असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. पुढेही तिचे वजन कायम वाढतच राहिले.

या संदर्भात अमिता म्हणाली, व्यायाम करून आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार घेऊनही तिचे वजन वयाच्या १६ व्या वर्षी १२६ किलो इतके होते. त्यावेळी मी जवळपास १४ ते १५ दिवस केवळ पातळ पदार्थ घेत होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या खात होते. त्याने काहीच फरक पडला नाही. वयाच्या २८ व्या वर्षी अमिताला शयनगृहामधून स्वच्छतागृहामध्ये नेण्यासाठी दोन मदतनिसांची गरज पडायची. शयनगृहामधून स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी मला ४५ मिनिटे लागायची. तेव्हा मी पूर्णवेळ झोपूनच असायचे. वजन कमी करण्यासाठी मी युरोपला पण गेले होते. त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे अमिताने सांगितले.

नातेवाईकांच्या सांगण्यानुसार २०१४ मध्ये अमिता डॉ. शशांक शहा यांना दाखवायला गेल्या. ते या क्षेत्रातील शस्त्रक्रिया करण्यातील तज्ज्ञ आहेत. त्यावेळी अमिताचे वजन ३०० किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. 

अमिताने शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केल्यावर तिला विशेष गाडीतून डॉ. शहा यांच्या पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे २०१५ मध्ये पहिल्यांदा अमितावर शस्त्रक्रिया laparoscopic sleeve gastrectomy करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन वर्षांनंतर अमिताचे वजन १३० किलोने कमी झाले. तिची रक्तातील साखर संतुलित झाली. रक्तदाब व्यवस्थित झाला. मूत्रपिंडाचे काम सुधारले, असे डॉ. शहा यांनी सांगितले. २०१७ मध्ये अमितावर दुसरी शस्त्रक्रिया gastric bypass करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या शस्त्रक्रियेवेळी अनेक आव्हाने होती. पण या सगळ्याला अमिताने चांगला प्रतिसाद दिला आणि आता तिचे वजन ८६ किलोपर्यंत खाली आले असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले.