पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक जून! मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त होणाऱ्यांचा 'वाढदिवस'

संग्रहित छायाचित्र

सर्वाधिक वाढदिवस असणारी कॅलेंडरमधील तारीख कोणती, असा प्रश्न जर कोणाला विचारला, तर त्याचे उत्तर एक जून असे देता येईल. कारण या दिवशी सर्वाधिक लोकांचा वाढदिवस असतो, असे दिसून आले आहे. अर्थात हा वाढदिवस केवळ सरकारी रेकॉर्डपुरताच. याच तारखेला यंदा मुंबई पोलिस दलातून तब्बल ४४४ कर्मचारी निवृत्त होत आहेत. ३१ मे हा त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस. या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी सध्या जय्यत तयारी मुंबई पोलिस दलाकडून केली जात आहे.

चालू कॅलेंडर वर्षात मुंबई पोलिस दलातून एकूण ८५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यापैकी ४४४ जण हे एकाच दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. या दिवशी मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांना भेट म्हणून मनगटी घड्याळ, सेवानिवृत्तीनंतरचे ओळखपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. मुंबई पोलिस दलातून एकाच दिवशी एवढे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, हे तसे नवीन नाही. ३१ मे रोजी सर्वाधिक कर्मचारी पोलिस दलातून निवृत्त होतात, हा जणू आता पायंडाच पडला आहे. पण याचे कारण अत्यंत रोचक आहे.

निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शिवाजी कोळेकर म्हणाले, एक-छे (१-६) ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या अनेकांची जन्म तारीख कागदोपत्री एक जून अशी आहे. पूर्वीच्या काळी कोणाचा जन्म कधी झाला, याची नोंद ठेवण्याचे काहीही मार्ग नव्हते. विशेषतः ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त होते. त्याचबरोबर असाक्षरता, संततीची मोठी संख्या यामुळेही पालकांकडून कोणते अपत्य कधी जन्माला आले याची नोंद ठेवली जात नव्हती. 

शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष हे एक जूनपासून सुरू होत असल्यामुळे पालकांकडून हीच जन्म तारीख म्हणून वापरली जाऊ लागली. ज्यांना आपल्या मुलाचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला झाला हे माहिती नव्हते. ते एक जून हीच जन्मतारीख म्हणून वापरू लागले. १९७० पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे त्यांनी म्हटले आहे.
३१ मे २०१४ रोजी सेवेतून निवृत्त झालेले सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा शिंदे सांगतात, माझा जन्म कोणत्या दिवशी झाला हे वडिलांना माहिती नव्हते. त्यामुळे माझ्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख एक जून अशी लिहून टाकली. शिंदे यांचे वडील शेतकरी होते. आणि ते कधीच शाळेत गेले नव्हते. वडिलांना केवळ एवढेच माहिती होते की दिवाळीनंतर पाऊस पडला होता. त्या दिवशी माझा जन्म झाला होता. त्यामुळेच शिक्षकांनी माझी जन्म तारीख एक जून लिहिली होती, असे ते सांगतात.

अर्थात ज्ञानोबा शिंदे यांनी पुढे आपली खरी जन्म तारीख शोधून काढली आणि ती २८ नोव्हेंबर असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय या दोन्ही तारखेला त्यांचा वाढदिवस साजरा करतात.