दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आता विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील पोलिस दलानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आझाद मैदान वगळता शहरात कोठेही आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आधी गुलाबाची फुले मग हिंसेत बदलत गेलं दिल्लीतलं आंदोलन
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात सोमवारी रात्री उशीरा आंदोलन करण्यात आले होते. दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला . त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या दिले.
Maharashtra Home Ministry officials: Mumbai kept on alert after recent incidents of violence in Delhi. State Police has taken precautionary measures to maintain law&order. Other than the designated area in Azad Maidan, no permission will be granted for any other protest in Mumbai
— ANI (@ANI) February 25, 2020
त्यानंतर मुंबई पोलिसांनी रात्री उशीरा २५ ते ३० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हिंसाचार घडू नये यासाठी विशेष खबरदारी गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. आझाद मैदान वगळता शहरात कोठेही आंदोलन करण्यासाठी परवानगी कोणालाही देण्यात येणार नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्ली हिंसाचारात ५ मृत्युमुखी, ४ जणांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा
दरम्यान दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सलग दुसऱ्या दिवशी उसळलेल्या हिंसाचाराच्या आगडोंबामुळे एका पोलिसासह इतर चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.