पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाऊदच्या बहिणीच्या ताब्यातील मालमत्तेचा लिलाव, वाचा कितीला विकला गेला फ्लॅट

नागपाडामधील इमारतीचे संग्रहित छायाचित्र

नागपाडामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकर हिच्या मालकीच्या एक फ्लॅटचा सोमवारी लिलाव करण्यात आला. तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची बोली लावून एका व्यक्तीने या फ्लॅटची मालकी मिळवली. फ्लॅट विकत घेणाऱ्या  व्यक्तीची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

या फ्लॅटची मालकी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच केंद्र सरकारच्या ताब्यात आली होती. संबंधित फ्लॅट हसिना पारकर यांनी कसा विकत घेतला, याची कोणतीच माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली नाही. त्याचबरोबर या फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराचीही कोणताही कागदपत्रे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने या फ्लॅटवर जप्ती आणून तो आपल्या ताब्यात घेतला. २०१४ मध्येच हसिना पारकर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

ई-लिलाव पद्धतीने या फ्लॅटचा लिलाव करण्यात आला. त्यासाठी किमान आधार किंमत म्हणून १.६९ कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या परकीय चलन गैरव्यवहार कायद्यानुसार हा लिलाव करण्यात आला. 

फ्लॅट विकत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना पुरेशी सुरक्षितता पुरविण्यात आली होती. लिलावावेळीही सुरक्षितता पुरेशी सुरक्षितता पुरविण्यात आली होती. एका व्यक्तीने हा फ्लॅट विकत घेतला आहे. पुढच्या तीन महिन्यांत लिलावाची रक्कम देण्याचे त्याच्यावर बंधन आहे. त्यानंतरच फ्लॅटचा ताबा त्याच्याकडे देण्यात येईल, असे या खात्याचे अतिरिक्त आय़ुक्त आर. एन डिसोझा यांनी सांगितले.

दाऊद किंवा त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यातील बेकायदा संपत्तीचा लिलाव करणे, याकडे सरकारने गेल्या काही वर्षांपासून लक्ष दिले आहे. यामुळे भारतातील त्याच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यावर मदत होईल, असे सरकारने म्हटले आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने नागपाडामधील दाऊदच्या ताब्यातील सात मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. या सर्व मालमत्ता चुकीच्या पद्धतीने दाऊदने विकत घेतल्याचे न्यायालयातील सुनावणीत स्पष्ट झाले होते. १९८० मध्ये दाऊद भारत सोडून पळून गेल्यानंतर त्याची आई अमिना आणि बहिण हसिना पारकर यांनी या सर्व मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या.