पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकरी आंदोलनातून मनसेचा ग्रामीण भागात पोहोचण्याचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. तत्पूर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यात दुष्काळच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहून राज्यातील ग्रामीण भागात आपले स्थान निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न मनसेकडून होताना दिसत आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे मनसेने शुक्रवारी ठाण्यात शेतकऱ्यांच्या बाजूने आणि भाजप सरकारविरोधात काढलेला मोर्चा. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आणखी मदत केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप सरकार शेतकरी विरोधात असल्याचे या मोर्चातून मनसेने सांगण्याचा प्रयत्न केला. 

लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा; राज ठाकरेंचे आदेश

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात भाजप शेतकरी विरोधी पक्ष असल्याचे चित्र रंगवले होते. ठाणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी गेल्या अनेक वर्षांपासून उभे राहत असलेले शेतकऱ्यांचे आंबा विक्रीचे स्टॉल काढल्याचा मुद्दा त्यांनी या पत्रात अधोरेखित केला होता.  

सरकारला फसवायचंच होतं, मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंची टीका

राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा पाया मजबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. राजकीय तज्ज्ञ हेमंत देसाई म्हणाले की, शहरी पक्ष असा मनसेवर बसलेला शिक्का पुसून काढण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मनसेच्या अजेंड्यावर प्राधान्याने शेतकरीच असल्याचे चित्रही निर्माण केले जात आहे.

मुंबई, ठाणे आणि नाशिक या भागात मनसेची पकड आहे. ग्रामीण भागात पक्षाचे अस्तित्व नाही. याउलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ग्रामीण भागात चांगला विस्तार केला आहे. शिवसेनेने ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बहुतांश ठिकाणी चांगली टक्कर दिली आहे. 

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात जुलमी राजवट उलथवण्याची ताकद- राज ठाकरे

राज ठाकरे यांनी २००६ मध्ये जेव्हा पक्ष स्थापन केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाचे व्हिजन मांडले होते. राज्यातील शेतकरी टी-शर्ट, जीन्स  घालून ट्रक्टर चालवताना पाहायचा आहे, असे त्यांनी म्हटले होते. मनसेने राज्यातील दुष्काळग्रस्त भागात अनेक ठिकाणी जनावरांसाठी छावण्याही सुरु केल्या होत्या. परंतु, त्यांनी त्यात सातत्य ठेवले नाही. 

पक्षाचे ग्रामीण भागाकडे दुलर्क्ष झाल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मान्य केले. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याचे पक्षाने ठरवले असून त्याप्रमाणे कामही सुरु केले आहे. आम्ही शहरी भागाकडे लक्ष केंद्रित केले होते. ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात शहरात स्थलांतर झाले होते. सर्व राजकीय पक्षांना शेतकऱ्यांनी जवळून पाहिले आहे. त्यांना आता राजसाहेब हवे आहेत. ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत, असेही ते म्हणाले.

दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, राज ठाकरेंची जनतेला विनंती

दरम्यान, रत्नागिरीचे एक शेतकरी सचिन मोरे हे ठाण्यातील विष्णु नगर येथे मागील ३ वर्षांपासून आंबा विक्रीचा स्टॉल लावतात. परंतु, काही दिवसांपूर्वी भाजपने हा स्टॉल अवैध असल्याचे सांगत तो काढून टाकला होता. त्यावेळी भाजप आणि मनसेचे कार्यकर्त्ये एकमेकांशी भिडलेही होते. पोलिसांना याप्रसंगी हस्तक्षेप करावा लागला होता. या प्रकरणावरुन राज्य सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारची वागणूक देते हे दाखवण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.