कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून दि. २२ ऑगस्टला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, ईडीचा वापर करत सरकार दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप मनसेसह विरोधी पक्षांनी केली आहे. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे बंद आंदोलन स्थगित केले असले तरी आता राज यांच्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते २२ ऑगस्टला ईडी कार्यालय गाठणार आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात मनसे कार्यकर्त्यांबरोबर कोणत्याही पक्षाचे नेते व राज यांच्यावर प्रेम करणारे सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. ईडी कार्यालयाकडे जाताना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.
मनसेचा 'ठाणे बंद' स्थगित, राज ठाकरेंचे आदेश
नांदगावकर म्हणाले की, २२ तारखेला कुठलाही गोंधळ न घालता, गडबड न करता शांतपणे ईडीच्या कार्यालयात जायचे आहे. यामध्ये फक्त मनसेचे कार्यकर्तेच नव्हे तर इतरही सहभागी होऊ शकतात. मोठ्या संख्येने लोक यात सहभागी होतील. आम्ही कार्यकर्त्यांना कुठेही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करु नका, असे आवाहन करतो. पण आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. गालबोट लावण्याचाही काही लोक प्रयत्न करु शकतात. पण आपण शांतपणे यायचे, असे आवाहन आम्ही केले आहे.
दरम्यान, मनसेच्या वतीने २२ ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता. पण राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर हा बंद स्थगित करण्यात आला होता. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याची माहिती माध्यमांना दिली. 'आमच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने २२ ऑगस्ट रोजी बंद पुकारला होता. परंतु, राज ठाकरे यांनी मला फोन करुन बंद मागे घेण्यास सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होईल, असे कृत्य करु नका, असे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही बंद मागे घेत आहोत,' अशी माहिती अविनाश जाधव यांनी 'एएनआय'ला दिली.