पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील दोन मेट्रो मार्ग पुढील वर्षाच्या सुरुवातीला कार्यरत, मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई मेट्रो (संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व मोठ्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मुंबईतील मेट्रो - २ए आणि मेट्रो - ७ हे दोन्ही मार्ग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतील, असे सांगितले. मेट्रो - २ए दहीसर ते डीएन नगर मार्गावर धावणार आहे. तर मेट्रो - ७ दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावणार आहे. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यावर सुमारे १६ लाख मुंबईकरांकडून त्याचा वापर केला जाण्याचा अंदाज आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे त्यापूर्वी मेट्रो - २ए आणि मेट्रो - ७ या दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पण मेट्रोचे डबे उपलब्ध होण्यास उशीर लागण्याची शक्यता असल्याने प्रत्यक्ष मेट्रो सुरू व्हायला पुढचे वर्ष उजाडू शकते.

मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दोन्ही मेट्रोच्या माध्यमातून ३५.१ किलोमीटरचा मार्ग मेट्रोच्या जाळ्यात येईल. दोन्ही मार्ग २०२० च्या सुरुवातीला सुरू करण्यात येतील. मेट्रो - २एचे काम ६५ टक्के तर मेट्रो - ७चे काम ६८ टक्के पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईसोबतच नागपूर आणि पुण्यातील मेट्रोच्या कामाचाही यावेळी आढावा घेतला. त्याचबरोबर नवी मुंबईतील विमानतळ, राज्यातील विविध सिंचन प्रकल्प, सी-लिंक प्रकल्प, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक आणि राज्यातील रेल्वे प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. 

पूर्णपणे भूयारी मुंबई मेट्रो -३ चे ४५ टक्के काम पूर्ण

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून भाजप-शिवसेना युती सरकारने मुंबई, पुणे आणि नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम कऱण्यावर भर दिला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून सोमवारी हा आढावा घेण्यात आला. मुंबईतील अन्य सहा मेट्रो प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण व्हायला हवेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. २०२२ पर्यंत डीएन नगर ते मानखुर्द (मेट्रो - २बी), कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३), वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४), वडाळा ते जीपीओ (मेट्रो - ४बी), ठाणे ते कल्याण (मेट्रो ६) आणि लोखंडवाला ते विक्रोळी (मेट्रो ५) हा एकूण ११९ किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विदर्भातील गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामाचाही आढावा घेतला. या प्रकल्पामुळे २.५१ लाख हेक्टरचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. येत्या २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे आश्वासन प्रकल्पाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.