इस्मामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचे कौतुक करणारा एक संदेश नवी मुंबईतील उरण येथील खोपटा पुलाच्या एका खांबावर लिहिण्यात आल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना हा संदेश दिसल्यावर त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. 'जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी' असा या संदेशात अबू बक्र अल बगदादी याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हिंदीतून हा संदेश लिहिण्यात आला असून, त्यामध्ये केजरीवाल, हाफिज सईद, राम कटोरी आणि रहिम कटोरी यांची नावे लिहिण्यात आली आहेत. संदेशाशेजारी बंदराची, विमानतळाची आणि इतर काही संस्थांची रेखाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. कुर्ला आणि घाटकोपरच्या भागाचीही रेखाचित्रे काढण्यात आली आहेत. मंगळवारी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
भागीदाराचा गळा कापून खून, पुण्यातून एक जण ताब्यात
या भिंतीवर अनेक मोबाईल क्रमांक आणि नावे लिहिण्यात आली आहेत. ज्यातून काही अर्थ निघत नाही. काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक मद्यपान करण्यासाठी रोज इथे येतात. संदेश ज्या खांबावर लिहिण्यात आला आहे. तिथे पोलिसांनी आता काळा रंग लावला आहे. कोणीतरी हा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. पण आम्ही याचा गंभीरपणे तपास करीत आहोत, असे संजय कुमार यांनी सांगितले.