पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन विशेष : मराठी शिक्षणाचे भविष्यचित्र

मराठी शाळा

भाषा, हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे, मग ती कुठलीही भाषा असो. सध्याच्या काळात, भारतामध्ये ज्या त्या प्रांतात, त्या त्या प्रांताच्या किंवा मातृभाषेच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात सामाजिक/ राजकीय वाद दिसून येतात. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर कुठच्याही कारणांमुळे किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे 'मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी अभिमान, मराठी बाणा' इत्यादी अनेक चांगल्या गोष्टीही चुकीच्या कारणांमुळे नाहक वादग्रस्त विषय ठरतात. आणि अशा प्रकारच्या वादांमुळे, घाईघाईत काही चुकीची किंवा अयोग्य निर्णय घेतले जातात हेच चित्र दिसून येतं. काही वेळेस, असंही आढळून येतं की धोरणं/निर्णय योग्य असतात, पण त्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई होते किंवा ती नीट राबवली जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे, मराठी भाषा, मराठी शिक्षण, मराठी शाळा हे कायमच चर्चेचे विषय राहिले आहेत.

मराठी भाषा दिन विशेष: कोल्हापुरी भाषा म्हंजे खटक्यावर बोट जाग्याव प्लटीच बघा!

मराठी शिक्षणाचे भविष्याचित्र याचे दोन-तीन अर्थ निघू शकतात. (१) मराठी माध्यमातून घेतलेले शिक्षणाचे भविष्यचित्र, (२) मराठी भाषेच्या शिक्षणाचे/अध्ययनाचे भविष्यचित्र आणि (३) मराठी भाषेच्या अस्तित्वाचे भविष्यचित्र. प्रस्तुत निबंधात क्रमांक (२) आणि (३) या अर्थाने पुढील काही विचार/निरीक्षणं मांडली आहेत.

मराठी भाषेचा विषय निघाला की बऱ्याचदा "मराठी शाळेत शिक्षण घेतलं तरच मराठी चांगलं येतं", इंग्रजी माध्यमातील मुलांचं मराठी कच्च असतं/ आंग्लाळलेलं असतं", "मराठी शाळेत शिक्षण घेतलं तरच मुलांचं वाचन चांगलं होतं" , "मराठी शाळा टिकल्या तरच मराठी टिकेल", "मराठी भाषेत संभाषण केलं, लिहिलं, तरच मराठीचा अभिमान असतो, नाहीतर तो मराठी भाषेचा अनादर आहे" इत्यादी अनेक गैरसमज आढळून येतात. अगदी मराठी/अमराठी, दोन्ही भाषिकांमध्ये. हे सगळे वास्तवाला धरून नाहीत आणि म्हणूनच अयोग्य आहेत.

अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं असलं तरी त्यांची भाषा किंवा उच्चार शुद्ध/प्रमाण नसते. याउलट इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन ही खूप मुलांची मराठी भाषा व उच्चार शुद्ध/प्रमाण असतात. हाच मुद्दा मराठी वाचन किंवा साहित्याची आवड असणे याबाबत. खरंतर यात वाचनाचा, वैयक्तिक आवडीचा भाग अधिक आहे. तसच एखाद्याची लहानपणापासून असलेली वाचनाची सवय, त्यासाठी मिळालेलं पोषक वातावरण व प्रोत्साहन आणि मग एखाद्या विशिष्ट प्रकारचं किंवा विशिष्ट भाषेतील साहित्य भावणे, ही सगळी कारणे असतात. पण ती सहजपणे दुर्लक्षित केली जातात.

मराठी भाषा दिन विशेष : अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!

असाच अजून एक गैरसमज म्हणजे "मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल." मराठी भाषा शिकणं, मराठीमध्ये संभाषण करणं, लिहिणं, वाचन करणं, मराठी भाषा ऐकणं या सगळ्या गोष्टींची सवय करून घेतली आणि त्यात सातत्य ठेवले तेव्हा खरंतर मराठी भाषा टिकून राहील. नुसत्या मराठी शाळा असणं पुरेसं नाही. आणि ही गोष्ट फक्त मराठीपुरती नाही तर कुठल्याही भाषेसाठी लागू आहे.

हल्ली खूप वेळा इंग्रजी/हिंदी भाषेत बोललं, लिहिलं किंवा मोबाईलमध्ये ही मराठी व्यतिरिक्त इंग्रजी मध्ये टाईप केलं तर लगेच "मराठीचा अभिमान नाही", "आम्हीच मराठी अस्मिता जपतो", इत्यादी टोमणे/ताशेरे सुरू होतात. आणि मूळ विषय/ संवाद बाजूला राहून "मराठी-इंग्रजी" भाषेवरून रणकंदन सुरू होते! मराठी भाषेमध्ये लिहिलं, बोललं नाही, तर त्या व्यक्तीला तुच्छ लेखण्याची गरज नाही. मराठी अस्मिता दाखवण्यासाठी दुसऱ्या भाषेचा अनादर करणं कधीही अयोग्यच. भाषा कुठलीही असो, ती नेहमीच वंदनीय आहे.

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

या काही गैरसमजुतींबरोबरच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठी भाषेसाठी घरातून आवश्यक असलेलं पोषक वातावरण न मिळणे. बऱ्याच कुटूंबांमध्ये आई - वडील मराठी बोलतात, पण मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेची सवय व्हावी म्हणून बरेच  पालक अट्टाहासाने त्यांच्याशी घरातही इंग्रजीतच बोलतात. आणि यामुळेच त्यांना घरात मराठीचं पोषक वातावरण मिळत नाही आणि पर्यायाने घरात सहज उपलब्ध असलेले मराठीचे अनौपचारिक शिक्षण, शब्दसंपदा ही तिथेच कमी होत जाते किंवा थांबते.

याच बाबतीत अजून एक बदल काही ठिकाणी आढळतो तो म्हणजे आई किंवा वडील या दोहोंपैकी एक जण मराठी भाषिक तर दुसरा इतर कुठला भाषिक असतो. यात ही आईची मातृभाषा दुसरी असेल तर अगदी सुरुवातीपासून मुलांबरोबर त्याच भाषेत अधिक बोलले जाते किंवा मग हिंदी किंवा इंग्रजीचा पर्याय स्वीकारला जातो. आणि मग पुन्हा मराठी भाषेला प्राधान्य मिळत नाही. खरं पाहता, एका कुटूंबात जर आई वडिलांपैकी एक जण इतर भाषिक असेल तर ही मुलांच्या दृष्टीने खूप हितावह गोष्ट आहे. अगदी लहानपणापासून मुलांना दोन-तीन वेगवेगळ्या भाषा शिकायला मिळू शकतात. निदान बोली भाषा तरी शिकता येऊ शकते. पण तसं न होता, परत इंग्रजीला प्राधान्य दिलं जातं, कारण ते शालेय शिक्षणाचं माध्यम!

मराठी भाषा दिन विशेष : भाषेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी

मुळात कुठचं ही शिक्षण घेताना किंवा कुठचीही भाषा शिकत असताना मुलांची बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता महत्त्वाची असते. भाषेसंदर्भात बोलायचं झालं तर साधारण आठ वर्षांपर्यंत मुलांचा वाचिक/ भाषिक विकास घडत असतो. कुमारवयीन किंवा प्रौढ वयाच्या तुलनेने, लहान वयात नवीन भाषा पटकन आत्मसात करता येतात. शाळांमध्ये ही पहिलीपासून साधारण तीन भाषांचं शिक्षण सुरू होते. पण हल्ली बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये (काही बोर्डांच्या नियमांनुसार) चौथीपर्यंतच मराठी विषय असतो आणि नंतर तो पर्यायी विषय म्हणून घेतला जातो. यामुळेही खूप विद्यार्थ्यांना इच्छा असूनही नाईलाजाने मराठी भाषेचे अध्ययन थांबवावे लागते. अर्थात मुलांवर भाषांचा मारा नक्कीच करू नये. कारण काही मुलांच्या बौद्धिक, मानसिक, वाचिक, भाषिक क्षमता वेगळ्या असू शकतात किंवा त्यांना काही ठराविक शालेय समस्या ही असू शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच, मुलांना ताण येणार नाही अशा पद्धतीने, वेगवेगळ्या भाषांचा परिचय करून द्यावा आणि पुढे त्यांच्या क्षमतेनुसार त्यात त्यांना प्रोत्साहन द्यावे.

शाळांबाबत अजून एक मुद्दा म्हणजे माध्यमांनुसार मराठी भाषेच्या स्तरातील फरक. मराठी माध्यम शाळेत उच्चस्तरीय मराठी, तर इंग्रजी माध्यम शाळांत निम्नस्तरीय मराठी. मराठी भाषेच्या स्तरांमध्ये उच्च - नीच भेद न करता, सरसकट सगळ्या शाळांमध्ये मराठीचा एकच स्तर ठेवावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच स्तरातील, एकाच दर्जाची मराठी भाषा आत्मसात करता येईल.

मराठी भाषा दिन विशेष : अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल...

अजून एक कारण म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात, केवळ इंग्रजीमुळे आपलं मूल मागे पडू नये म्हणून पालकांनीच केलेला इंग्रजीचा अट्टाहास! सध्याच्या काळात, किती मुलं दररोज मराठी वर्तमानपत्र वाचतात. यापेक्षा ही किती घरांमध्ये दररोज मराठी वर्तमानपत्र येतं हा प्रश्न विचारणं अधिक योग्य ठरेल. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी चांगलं यावं, म्हणून काही पालक, मुद्दाम इंग्रजी वर्तमानपत्र अगदी आग्रहाने/कौतुकाने वाचायला देतात!

काही मराठी भाषिक पालकांना आपले पाल्य इंग्रजी माध्यमात शिकते, बोलते म्हणून अभिमान असतो आणि मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आणि पालकांना तुच्छ लेखण्याची वृत्ती असते. तर त्याहून खेदजनक म्हणजे काही मराठी भाषिक पालकांनाही आपलं मूल मराठी माध्यमात शिकतं किंवा इंग्रजी नीट बोलता येतं नाही म्हणून न्यूनगंड असतो! मूळात मराठीच काय, कोणालाही आपली मातृभाषा किंवा इतर कुठल्याही भाषेबद्दल आदर आणि आत्मीयता असायला हवी. आणि 'मराठी अस्मिता' जपण्यासाठी किंवा मराठी भाषा टिकवण्यासाठी, दुसऱ्या भाषांचा अनादर करून किंवा कमी लेखून तसं होणार नाही. त्यासाठी मराठी घराघरांतून मराठी भाषेची अधिकाधिक सवय व्हायला हवी.

मराठी भाषेबद्दल सद्यस्थिती थोडी चिंताजनक असली तरी निराशाजनक नक्कीच नाही. 'मराठी भाषा मागे पडते आहे', 'मराठीला डावललं जात आहे', असे नुसते म्हणण्यापेक्षा, तसं का होतंय, याला कोण जबाबदार आहे या गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तसंच आपल्या रोजच्या जीवनात आपण पुढीलप्रमाणे काही छोटे छोटे बदल सुरू करू शकतो: (१) मुळात मराठी भाषेबद्दल आदर व प्रेम असणे. (२) मराठी प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोहोंना महत्त्व देणे. (३) नवीन पिढीत मराठी रुजवण्यासाठी, त्यांना सतत मराठी भाषेच्या सान्निध्यात ठेवणे. आपण स्वतःही त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांतून (रेडिओ, टीव्ही, खेळ, शब्दकोडी, पुस्तके, नाटक, चित्रपट, चर्चा, व्याख्याने, स्पर्धा इ.)  मराठी भाषा ऐकण्याची, बोलायची, वाचनाची, लिहिण्याची, भाषांतर करण्याची सवय करून घेणे. (४) मराठी श्लोक, संस्कृत श्लोक, सुभाषिते, इत्यादी म्हणण्याची सवय करून घेणे. देवधर्म या विषयावर एखाद्याचे वेगळे विचार असतील तर जमल्यास धार्मिक संदर्भ बाजूला ठेवून श्वसनाचे व्यायाम, जिभेला येणारे वळण, स्पष्ट शब्दोच्चार, पाठांतर, स्मरणशक्ती, सकारात्मक ऊर्जा ही शास्त्रीय कारणे लक्षात घेऊन तरी एक प्रयोग किंवा उपक्रम म्हणून करून बघणे. शारीरिक, मानसिकरीत्या नक्कीच चांगला फरक अनुभवास येईल.

मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार

"प्रत्येक परिस्थितीमध्ये आशावाद असणं गरजेचं आहे" हाच सकारात्मक विचार करून आपण सगळ्यांनीच जर आपल्या विचारांमध्ये, वृत्तींमध्ये आणि सवयींमध्ये काही योग्य बदल केले, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर मुळातच श्रीमंत आणि समृद्ध असलेल्या मराठी भाषेचे, मराठी शिक्षणाचे, भविष्यचित्र निश्चितच उज्ज्वल आहे!

- राजश्री भिसे, मानसोपचार तज्ज्ञ, मुंबई

(rajashri.bhise@gmail.com)