महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारांप्रकरणी येत्या शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी मी स्वतःहून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार असून, त्यांना माझ्याकडून जी माहिती हवी असेल, ती मी त्यांना देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्रकरणी शरद पवार यांच्याविरोधातही सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्याचे वृत मंगळवारी संध्याकाळी वाऱ्यासारखे महाराष्ट्रात पसरले. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली.
राज्य बँकेत एका पैशाचाही भ्रष्टाचार नाहीः अजित पवार
शरद पवार म्हणाले, मी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार माणूस आहे. देशाच्या राज्यघटनेवर माझा विश्वास आहे. आता या प्रकरणात माझे नाव असल्याचे मला कळले आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने मी सातत्याने मी पुढील महिनाभर दौऱ्यावर असणार आहे. त्यातच मला माझ्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याचे कळल्याने मी येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वतःहून सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाणार आहे. त्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती मी द्यायला तयार आहे. तसेच त्यांचा जो पाहुणचार असेल तो स्वीकारायलाही मी तयार आहे.
आम्ही सूडबुद्धीने वागणारे नाही, उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्यास मी तयार आहे. त्याचबरोबर माझ्याविरुद्ध नक्की गुन्हा काय आहे, हे सुद्धा मला समजून घेतले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, मी कधीही राज्य सहकारी बँकेंचा संचालक राहिलेलो नाही. राज्यातील विविध संस्थांचे संचालक माझ्याकडे वेगवेगळे प्रश्न घेऊन येत होते. त्यावेळी केवळ केंद्र आणि राज्य सरकारशी बोलण्याची भूमिका मी पार पाडली होती, असे त्यांनी सांगितले.