पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाकारण्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

सर्वोच्च न्यायालय

पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजाला दिलेले आरक्षण यंदा ग्राह्य धरण्यात येणार नाही, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर येथील खंडपीठाने गेल्या आठवड्यात हा निकाल दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुटीच्या काळातील विशेष याचिका दाखल केली.

मराठा समाजाला राज्य सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून जे आरक्षण दिले आहे. त्या आधारावर प्रवेश देण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालयाने आपला निकाल देऊ नये, यासाठी हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात यंदा मराठा आरक्षण नाही

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ८ मार्च रोजी जो सरकारी आदेश काढला आहे. तो पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गृहीत धरता येणार नाही. कारण या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची (नीट) नोंदणी प्रक्रिया १६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजीच सुरू झाली होती, असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केवळ तांत्रिक मुद्द्यांवर उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला असल्याचे मत राज्य सरकारने मांडले आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण लागू होण्याअगोदर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी हे प्रवेश आरक्षण लागू झाल्यानंतरच होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आरक्षणाच्या कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी वटहुकूम आणण्याची तयारी सरकारने केली असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण कायदा अंमलात येण्यापूर्वी ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी तरतूद या वटहुकूमात करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra moves SC against Bombay high court bar on Maratha quota in PG medical dental admissions