पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इतरांच्या तुलनेत अनुदानित मराठी शाळांवर सरकारकडून सर्वाधिक खर्च - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली

डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे मुलांचा ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर ती वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत दिली.

‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सोमवारी विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत ते बोलत होते. शिष्टमंडळाने मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश

शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्य‍िक मधू मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर आदींचा समावेश होता.

फडणवीस म्हणाले, अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत अनुदानित मराठी शाळांवर महाराष्ट्र हे सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुले या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. राज्याकडे शालेय शिक्षणासाठी साधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि यापुढेही ती भासू दिली जाणार नाही. पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृध्द व्हावी यासाठी कालबध्दरित्या असे प्रयत्न केले जातील. या प्रयत्नांसाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘मराठी भाषा संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे स्वागतच आहे.’

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

यावेळी झालेल्या चर्चेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबतही चर्चा झाली.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra government is spending more on aided marathi school says chief minister devendra fadnavis