मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयाच्या दालनात राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सुभाष देसाई, विजय शिवतारे, भाजपचे नवनियुक्त खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला नाही. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी ते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
'मंत्रिमंडळ विस्तारावेळी सेनेसह इतर घटक पक्षांची अपेक्षापूर्ती होईल'
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. आपल्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसमधून भाजपच्या वाटेवर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्यासोबत आणखी कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठऱेल.