पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोपांवरून विधानसभेत गदारोळ

विधानभवन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. या प्रकारामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जपानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले...

जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेले आरोप बुधवारी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले होते. पण गुरुवारी या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांनी आपले उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांच्या उत्तरानंतर जयंत पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला. जर चंद्रकांत पाटील यांचे उत्तर सभागृहाच्या पटलावर येणार असेल, तर मी केलेले आरोपही सभागृहाच्या कामकाजात आले पाहिजेत. जर मी केलेले आरोपच सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले असतील, तर चंद्रकांत पाटील उत्तर का देत आहेत, असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा यावेळी जयंत पाटील यांची बाजू घेऊन सरकार चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचे सांगितले. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे ते म्हणाले. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे दोन रेल्वे अपघात टळले, नाहीतर...

या सगळ्या प्रकारानंतर विधीमंडळ कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याही मंत्र्यांविरुद्ध आरोप करताना त्यांची नोटीस आदल्या दिवशी अध्यक्षांना दिली पाहिजे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ सभागृहात बाजू मांडू लागले. विरोधक सभागृहाच्या कामकाजाचे संकेत मोडू पाहात आहेत. नवे नियम लागू करू पाहात आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दोन्ही बाजूचे सदस्य ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पाहून विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब कऱण्यात आले.

आरोप काय?
हवेली तालुक्यातील केसानंद गावातील देवस्थानला इनामी मिळालेली २३ एकर जागा बांधकामासाठी देण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी घेतला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या जागेसंदर्भात दिलेल्या आदेशांना बाजूला सारून ही जागा बांधकामासाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. महसूल विभागाने गेल्या काही वर्षांत दिलेल्या आदेशांवरून ही जागा देवस्थानची असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

केसानंदमधील म्हातोबा मंदिर विश्वस्त समितीच्या व्यवस्थापकांच्या ताब्यात ही जागा होती. नंतर ती राधास्वामी सत्संग व्यास या एका धार्मिक संस्थेकडे हस्तांतरित झाली. दहा वर्षांपूर्वी या ट्रस्टने महसूल विभागाकडे अर्ज करून संबंधित जागेवर बांधकाम करण्यासाठी ती बिगर शेतजमीन करण्याची मागणी केली होती. 

संबंधित जागा देवस्थानला इनामी दिलेली असल्यामुळे ती बिगर शेतजमीन करण्यासाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी शासकीय नियमानुसार ट्रस्टकडे ४२ कोटी रुपयांचा नजराणा सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले. चंद्रकांत पाटील यांनी संबंधित जमीन खासगी असल्याचे सांगत नजराणा देण्याचा आदेश रद्दबातल केला, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावताना १८८५ मधील जमीन दस्तावेजानुसार आपण निर्णय दिल्याचे सांगितले. ब्रिटिशकालीन दस्तावेजानुसार ती जागा खासगी असल्याचे आढळून आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. (स्रोत - हिंदूस्थान टाइम्स)