पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेची निवडणूक एकतर्फी न होण्याची प्रमुख कारणे

अमित शहा आणि शरद पवार

अबकी बार २२० पार अशा थाटाच्या घोषणा जरी भाजपच्या काही नेत्यांकडून देण्यात येत असल्या तरी मतमोजणीच्या दिवशी तो केवळ शब्दांचा बुडबुडाच असल्याचे दिसून आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमधील कल हाती आले असून, त्यामध्ये भाजपच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी होत असल्याचे दिसते आहे. भाजप आणि शिवसेना युती सत्तेत परतण्याची चिन्हे असली तरी त्यांनी जी हवा तयार केली होती तशी वास्तविकता नसल्याचे दिसते. या मागील प्रमुख कारणांचा घेतलेला वेध... 

आकडे इतकेही वाईट नाहीत - संजय राऊत

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. वयोमानाचा विचार न करता राज्याच्या अनेक भागांत शरद पवार यांनी जाहीर सभा घेऊन भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम पर्याय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत झाल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा गेल्यावेळी हातातून गेलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या दिशेने खेचण्यास सुरुवात केली आहे.  

२. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असलेला रोष आहे हे जाणून त्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरला. पक्षाने आपल्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले.

३. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपने प्रचारात आक्रमकपणे वापरला. पण त्याला लागलीच विरोधकांकडून उत्तर देण्यात आले. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आणि कलम ३७० रद्द करण्याचा काय संबंध, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे काही प्रमाणात मतदारही या मुद्द्यावर विचार करू लागले. त्याचाही परिणाम मतदानावेळी झाल्याचे दिसते.

सचिन सावंत यांच्या 'त्या' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

४. काँग्रेसने या निवडणुकीत अपेक्षितपणे प्रचार केला नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात एकही प्रचारसभा घेतली नाही. तरीही काँग्रेसचे स्थानिक नेते आणि उमेदवार यांनी आपापल्या ताकदीवर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काँग्रेसच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा फार कमी झाल्याचे दिसत नाही. त्यातही काँग्रेसची पाळमुळे आजही ग्रामीण भागात घट्ट आहेत. त्यामुळे अनेक मतदारांनी ईव्हीएमवर पंजासमोरील बटण दाबल्याचे दिसते आहे. 

५. सोशल मीडियाचाही राष्ट्रवादी काँग्रेसने चांगल्या पद्धतीने वापर केला. शरद पवार यांच्या जाहीर सभांचे फेसबुक लाईव्ह, भाजपने दिलेली आश्वासने कशी खोटी ठऱली हे दाखवून देणे, गेल्या पाच वर्षांत कोणती कामे झाली नाहीत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देण्यात विरोधक यशस्वी ठरले. त्याचाही परिणाम निवडणुकीवर झाला.