पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेसाठी खूशखबर!

लोकसभा निवडणूक (संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी बघितल्यावर शिवसेनेने आपला बालेकिल्ला अर्थात मुंबईतील महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ अभेद्य ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळी आव्हाने असतानाही शिवसेनेशी जोडलेला मतदार अद्याप कायम आहे. शिवसेनेच्या मतदारांनी येथील सर्व लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात मदत केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी स्पष्ट झालेली ही आकडेवारी शिवसेनेसाठी सुखकारकच म्हणावी लागेल.

मुंबईतील १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारांना ११,७१,०४३ मते मिळाली. यामध्ये युतीच्या उमेदवारांना ५,०७,९६० मतांची आघाडी मिळाली. याची सरासरी काढल्यास या १४ मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारांना ३८,२८२ मतांची आघाडी मिळाली आहे. शिवसेना-भाजप युतीने मुंबईतील सहाही लोकसभा जागांवर विजय संपादन केला.

अरविंद सावंत यांच्या विजयात मलबार हिलवासियांचा सिंहाचा वाटा!

मुंबईतून राज्यातील विधानसभेत ३६ आमदार पाठवले जातात. त्यामुळे वरील आकडेवारीला महत्त्व आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत यापैकी १४ जागा शिवसेनेला, १५ भाजपला आणि पाच जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळची निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. 

राज्यातील मंत्री आणि शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर म्हणाले, २०१४ पासून शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या कामाची पावती म्हणजेच विविध ठिकाणी युतीच्या उमेदवारांना मिळालेली आघाडी आहे. लोकसभेचे निकाल हे विधानसभेमध्ये परावर्तित होत असतात. यावेळी तर आम्ही गेल्यावेळेपेक्षा जास्त मते मिळवू, असे वायकर म्हणाले. गेल्यावेळी आम्ही भाजपच्या मदतीशिवाय १४ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आमची युती असल्याने त्यापेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे त्यांनी सांगितले.

मागठाणे विधानसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक आघाडी मिळाली होती. या ठिकाणी शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. त्यांनी येथील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना तब्बल ७१८६९ मतांची आघाडी मिळवून दिली. गोपाळ शेट्टी यांनी अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा ४,६५,२४७ मतांनी पराभव केला.

पूनम महाजन यांच्या मदतीला विलेपार्ले, चांदिवली आले धावून!

शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले शिवडीमध्ये ५०,०३२ आणि माहिममध्ये ५३,४९० मतांची आघाडी युतीच्या उमेदवारांना मिळाली.

दरम्यान, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शिवसेनेचा परफॉर्मन्स समाधानकारक नाही. या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना तीन विधानसभा मतदारसंघांतून अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती. वांद्रे पूर्वमधून त्यांना केवळ १२७६ मतांची, कुर्ल्यातून ४६९८ आणि कलिनामधून ९४८५ मतांची आघाडी मिळाली होती. 

या संदर्भात शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे. ते भाजपला मतदान करीत नाहीत. त्यामुळे येथील आघाडी कमी होती. पण विधानसभेला ते पुन्हा शिवसेनेवर नक्कीच विश्वास दाखवतील.