महाराष्ट्राचे पुढचे सरकार तुमच्या नेतृत्त्वाखालीच येणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक असे वक्तव्य केले. कोई शक है आपको... एवढ्या मोजक्या शब्दांत त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. मुंबईत 'इंडिया टुडे' कॉनक्लेव्हमध्ये शनिवारी देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.
'आयुष्यात मला पराभव माहीत नाही, राजू शेट्टींनी विचार करुन बोलावं'
गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सत्ता समर्थपणे सांभाळून विरोधकांना चोख उत्तर दिले, हे कसे काय शक्य झाले, या स्वरुपाच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये न बसणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री केले. त्यावेळी त्यांनी मला इतकेच सांगितले होते की, महाराष्ट्राची प्रतिमा खूप खराब झाली आहे. भ्रष्टाचारी, दलालांचे राज्य अशी राज्याची प्रतिमा झाली आहे. प्रतिमा सुधारण्याचे काम त्यांनी माझ्याकडे दिले. त्यानंतर माझ्यापुढे जी जी आव्हाने निर्माण झाली त्यांच्याकडे मी सकारात्मकपणे बघत गेलो. त्यातून मार्ग निघाले. यातूनच जे सरकारवर दगड टाकण्यासाठी आले होते. त्यांच्याच हातात आज फुले आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
'महाराष्ट्रानं मला भरभरून दिलं, आता कोणतीही इच्छा नाही'
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्यात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.