पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० काँग्रेससाठी राजकीय तर भाजपसाठी देशभक्तीचा मुद्दाः अमित शहा

अमित शहा

देशात दोन ध्वज, दोन पंतप्रधान, दोन संविधान भाजपला कधीच मान्य नव्हते. या देशात एक ध्वज, एक पंतप्रधान, एक संविधानच असले पाहिजे. यासाठीच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. काश्मीरमधून कलम ३७० हटवणे काँग्रेससाठी राजकीय मुद्दा आहे. पण भाजपला यात राजकीय नव्हे तर देशभक्ती दिसते, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुंबईत कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हटलं अमित शहांनी...

काश्मीरसाठी पहिले बलिदान हे श्यामाप्रसाद मुखर्जींचे आहे. नेहरुंनी युद्धविराम दिल्यानेच पीओकेचा प्रश्न उभा राहिला आहे. भारतीय सैन्याने आघाडी घेतली होती. पण अचानक त्यांनी युद्ध थांबवले. नेहरुंची ती मोठी चूक होती. त्यामुळे तो प्रदेश वादग्रस्त जाहीर करण्यात आला. त्यावेळी त्यांनी थांबवले नसते तर आज हा प्रश्नच उभा राहिला नसता. 

दिल्ली करार हे कलम ३७० चे मूळ आहे. ३७० कलमामळे देशात दहशतवाद आला. पाकिस्तानला फुटीरतावादासठी एक साधन मिळाले. काश्मीरमधून पंडितांना बाहेर काढण्यात आले. १९९० पासून आतापर्यंत काश्मीरमध्ये ४० हजार लोक दहशतवादाचे बळी ठरले. इतके होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीवाले आम्हाला विचारतात कलम ३७० का हटवले.

कलम ३७० मुळ काश्मिरात स्थलांतर करणे कठीण होते. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मोठा मुद्दा हाच उचलला आणि ५ ऑगस्ट रोजी हे कलमच हटवले. ५ ऑगस्टपासून काश्मीरमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. एकदाही गोळीबार झालेला नाही. काश्मिरात दहशतवाद नव्हे तर विकास होईल. येणाऱ्या काही दिवसांत काश्मीरमधील संपूर्ण दहशतवाद संपुष्टात येईल. एसटी, एसटी, ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळेल. यापूर्वी काश्मीरमधील दलित, आदिवासींना आरक्षण मिळत नव्हते. काश्मीरात अॅट्रोसिटी अॅक्टच अस्तित्वात नव्हता. मानवी हक्क आयोग नव्हता, बालविवाह विरोधी कायदा नव्हता. तिथे हजारो अल्पवयीन मुलींचे लग्न करण्यात आले. दिव्यांगांसाठी कोणताच कार्यक्रम नव्हता. त्यांच्यासाठी आता विविध योजना लागू झाल्या आहेत.

काश्मीरमध्ये भ्रष्टाचार विरोधी विभागही नव्हता. तीन कुटुंबांनी तिथल्या जनतेला लुटले. भ्रष्टाचार नसला असता तर प्रत्येक काश्मिरीच्या घरावर सोन्याचे पत्रे असले असते. आता तिथे भ्रष्टाचार विरोधी विभाग स्थापन करण्यात आला आहे. तिथल्या थंडीतही भ्रष्टाचाऱ्यांना घाम यायला सुरुवात झाली आहे. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Amit Shah addresses a seminar on Abrogation of Article 370 from Jammu and kashmir in Mumbai Maharashtra