पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उर्मिला मातोंडकर यांचा धडाक्यात प्रचार, गुजराती समाजाच्या भेटीगाठी

उर्मिला मातोंडकर आणि पृथ्वीराज चव्हाण

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या मतदारसंघाकडे वळले आहे. उर्मिला मातोंडकरही आपल्या भाषणांमधून, त्यात उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांच्या माध्यमातून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या एक दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मतदारसंघातील वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या, महिलांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या मतदारसंघात गुजराती समाजाचे वर्चस्व आहे. त्यांच्यापर्यतही पोहोचण्यासाठी विविध भागात त्यांनी दौरे काढले.

उत्तर मुंबई मतदारसंघातील बोरिवली-कांदिवली भागात गुजराती समाजाचे वर्चस्व आहे. या भागात साधारणपणे २४ टक्के मतदार हे गुजराती आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. पण यावेळी काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना ऐन निवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरात उर्मिला मातोंडकर यांनी धडाडीने प्रचारास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत एकदीच एकतर्फी होणार नाही, असे राजकीय अभ्यासकांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या गुजराती विभागाने गुरुवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात उर्मिला मातोंडकर यांनी थेट गुजराती भाषेतूनच उपस्थितांशी संवाद साधला. गुजराती समाजाने मुंबईच्या प्रगतीसाठी मोठे काम केले आहे. या समाजाने २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. पण भाजपचे समाजात दुही माजवणारे राजकारण थांबवायचे असेल, तर यावेळी काँग्रेसला साथ द्या, अशी मागणी त्यांनी केली.

उत्तर मुंबई मतदारसंघात सर्वाधिक प्रमाणात असलेल्या मराठी लोकांनी उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. आता गुजराती आणि जैन समाजातील लोकांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यास मतदारसंघातील चित्र बदलू शकते, असेही तो म्हणाला.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षच निवडून येईल, याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, असे उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या गुजराती विभागाचे प्रमुख मेहुल गोसलिया यांनी सांगितले.