पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही असे पवार म्हणालेच नाहीत'

शरद पवार

पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीच म्हणाले नाहीत. त्यांनी फक्त आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, एवढेच म्हटले असल्याचे पक्षाचे नेते माजिद मेमन यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यानंतर माजिद मेमन यांनी आपले म्हणणे मांडले.

संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये शरद पवार हे सर्वाधिक स्वीकारार्ह नेते आहेत. त्यामुळे एकमताने त्यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता अधिक आहे. जर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी भाजपला बहुमत मिळाले नाही, तर शरद पवार हे सुद्धा संयुक्त पुरोगामी आघाडीत पंतप्रधानपदासाठी पर्याय ठरू शकतात, असे मेमन यांनी स्पष्ट केले.

माजिद मेमन हे राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांना एकत्र आणून त्यांची आघाडी करण्यामध्ये शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

दोन दिवसांपूर्वी खुद्द शरद पवार यांनी पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपच्या नेत्या मायावती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे योग्य पर्याय असल्याचे म्हटले होते. त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्यामुळे ते या पदासाठी योग्य असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर माजिद मेमन यांनी वरील विधान केले आहे.