पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ममता, मायावती, चंद्राबाबू नायडू पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार'

चंद्राबाबू नायडू आणि शरद पवार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे पंतप्रधानपदासाठी नावच शरद पवार यांनी न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळतील आणि राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, असे काँग्रेसने म्हटले होते. पण मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे प्रशासकीय अनुभव असल्यामुळे तेच पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवार आहेत, असे खुद्द शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा केंद्रात सत्तेत येणार नाही, असे भाकीत शरद पवार यांनी याआधीच केले आहे. त्यावेळी त्यांनी पुढील पंतप्रधान कोण असू शकतो, याबद्दलची आपली मते एका वाहिनीच्या मुलाखतीत मांडली. 

पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव होता. हाच अनुभव गाठीशी असल्यामुळे देशांच्या पंतप्रधानपदाची धुरा ते सांभाळू शकतात, असे शरद पवार म्हणाले. राहुल गांधी यांनी याआधीच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

शरद पवार यांनी कोणत्या संदर्भातून हे वक्तव्य केले, हे अद्याप स्पष्ट नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असे आम्हाला वाटते. राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे काँग्रेसचे राज्यातील सरचिटणीस सचिन सावंत यांनी सांगितले.