पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यावेळी मोदी लाट नाही, त्सुनामी आहे, पूनम महाजन यांना विश्वास

पूनम महाजन

देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये १० ते १५ टक्के मतदार तरुण आहेत. त्यांचा खंबीर नेतृत्त्वावर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. २०१४ मध्ये मोदी लाट होती, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. पण यावेळी मोदी लाट नाही तर त्सुनामी आहे. या त्सुनामीमध्ये विरोधी पक्ष वाहून जातील, असे भाकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी केले आहे. त्यांची लढत यंदा काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्याशी आहे.  

'हिंदूस्थान टाइम्स'शी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या, स्वतःची घराणेशाही वाचविण्यासाठी यावेळी निवडणुकीत सर्व युवराज एकत्र आले आहेत. मग ते अखिलेश यादव असू दे की तेजस्वी यादव. या लोकांना खरंच देशसेवा करायची आहे का, हा प्रश्नच आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विविध योजनांचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला आहे. त्यामुळे हाच महत्त्वाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत दिसून येतो आहे. काही पक्षांनी मु्स्लिम आणि दलितांचा केवळ मतपेढी म्हणून वापर केला. पण मोदी सबका साथ, सबका विकास हा उद्देश घेऊन पुढे निघाले आहेत. मी एक तरुणी आहे आणि मी हे आत्मविश्वासाने सांगू शकते की देशातील तरुण मतदार जात आणि धर्माच्या आधारे यापुढे विभागला जाणार नाही.

आज भारत जगातील सर्वात मोठी सहावी अर्थव्यवस्था आहे. तरुणांची स्वप्ने त्यांच्या इच्छा-आकांक्षा यामध्येच या अर्थव्यवस्थेच्या वाढीचे सार सामावले आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगून पूनम महाजन म्हणाल्या, पारंपरिक पद्धतीने नोकऱ्या करण्यास इच्छुक नसलेल्यांसाठीच कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापन करण्यात आली आहे. केवळ नोकरी मागणाऱ्यांचा विचार करून चालणार नाही. तर नोकरी देणारे, रोजगार उपलब्ध करणारेही तयार व्हायला हवेत. त्यासाठी केंद्र सरकारने स्टार्ट अप धोरण आणले. झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकही आता मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ शकतात, हे सुद्धा आमचे यशच आहे. 

भाजप आणि शिवसेना हे दोघेही गेल्या २५ वर्षांपासून एकत्र आहेत. महाआघाडीसारखे फक्त सत्तेसाठी ते एकत्र आलेले नाहीत. एवढे वर्ष एकत्र असल्यामुळे काही गोष्टी निश्चितच घडतात, असेही त्यांनी भाजप-शिवसेना युतीबद्दल बोलताना सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Among young voters of India not a Modi wave but a Tsunami Poonam Mahajan