पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Karan Oberoi case : वकिलानेच केला पीडितेवर हल्ला

करण ओबेरॉय

बलात्काराच्या आरोपाखाली अभिनेता  करण ओबेरॉय अटकेत आहे.  या प्रकरणातील पीडित महिलेवर २५ मे रोजी अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला केला होता. यासंबधी लेखी तक्रारही  महिलेनं ओशिवरा पोलिस स्थानकात नोंदवली होती. या प्रकरणाला आता वेगळंच वळण लाभलं असून पीडितेवर हल्ला हा तिच्याच वकिलानं केला असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.

पीडित महिलेच्या वकिलानं आपल्या काही नातेवाईकांना  आणि ओळखीच्या व्यक्तींना हाताशी धरून हल्ल्याचा बनाव रचला होता. बलात्कार प्रकरणात अधिक लक्ष वेधून घेण्यासाठी पीडित महिलेचा वकील अली कासीफ खान  यानं हा कट रचला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना दिली. 

लग्नाचे आमिष दाखवून करण ओबेरॉयनं बलात्कार केल्याचा आरोप  एका महिलेनं केला होता. तिच्या तक्रारीनंतर ५ मे रोजी करण ओबेरॉयला अटक करण्यात आली. त्यानंतर २५ मे रोजी पीडितेनं  पुन्हा एकदा पोलिसात तक्रार दाखल केली. लोखंडवाला परिसरात सकाळी ६.३० वाजता वॉकला गेले असताना,  दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची तक्रार तिनं दिली.  हे हल्लेखोर बाईकवरून आले, त्यांनी आपल्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला तसेच करण ओबेरॉयवरील केस मागे घे असं धमकीपत्रही दिल्याचं संबधीत महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. 

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली. मात्र हा हल्ला  केवळ बनाव असल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या वकिलाला अटक केली आहे त्याच्यावर  कलम १२० ब आणि २०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र वकील अली कासीफ खानची जामिनावर सुटका देखील झाली आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून  त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर हे  वकिलाचे नातेवाईक होते. पीडित महिलेच्या वकिलानं या हल्लेखोरांना १० हजार रूपये दिले असल्याचंही चौकशीत समोर आलं.