पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचारः गेट वे ऑफ इंडिया येथून आंदोलकांची आझाद मैदानावर रवानगी

JNU हिंसाचारः गेट वे ऑफ इंडिया येथून आंदोलकांची आझाद मैदानावर रवानगी

गेल्या ३० तासांहून अधिक काळापासून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांची पोलिसांनी आझाद मैदानावर रवानगी केली आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना गेट वे ऑफ इंडियावरुन हलवण्यात आले आहे. पोलिसांनी विनंती करुनही आंदोलक विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची, सामान्य नागरिकांची अडचण येत आहे, त्यामुळे आंदोलकांनी आपले आंदोलन आझाद मैदानावर करण्याची विनंती केली. परंतु, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मुंबई पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांनी उचलून पोलिस व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांना आझाद मैदानावर नेले. 

रविवारी सायंकाळी जेएनयूमध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा या हिंसाचाराच्या निषेधार्थ विद्यार्थी आंदोलकांनी कँडल मार्च काढला. तसेच कोणतीही परवानगी न घेता गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी सुरुवातीला फक्त एक दिवस आंदोलन करत असल्याचे म्हटले. पण नंतर ते ऐकण्यास तयार नव्हते. पोलिसांनी आंदोलकांना आपले आंदोलन आझाद मैदानावर जाण्यास विनंती केली होती, असे झोन एकचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी माध्यमांना सांगितले. 

ते म्हणाले की, आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची आम्ही विद्यार्थ्यांना विनंती केली होती. त्यांनी मोर्चा काढणार नसल्याचेही म्हटले होते. परंतु, आंदोलकांनी अचानक मोर्चा काढला, रस्ते जाम केले. जवळ रुग्णालय आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला होता. आंदोलकांनी पोलिसांना गृहीत धरले होते. त्यांना आवाहनही केले. त्यांना विनंतीही करुनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्यातच ताळमेळ नव्हता. आम्ही गाडी त्यांच्यासमोर ठेवली. तरीही ते स्वतःहून गेले नाही. त्यामुळे अखेर आम्हाला त्यांना आझाद मैदानावर नेले. गेट वे ऑफ इंडियावर मोठ्या प्रमाणात कचराही झाला आहे. हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. परदेशातूनही येथे मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात. त्यांना त्रास होत होता.

आम्ही आंदोलकांना ताब्यात घेतले नव्हे. त्यांना आझाद मैदानावर हलवले आहे. तिथे त्यांच्यासाठी पाण्याची आणि स्वच्छतागृहाचीही सोय केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, सोमवारी आंदोलनस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनीही आंदोलनस्थळी येत पाठिंबा दर्शवला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:JNU Violence Mumbai Protesters at Gateway of India evicted by Police and relocated to Azad Maidan