सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे राज्यातील कोणत्याही नागरिकामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्यास सामान्य दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊ नका. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी खास रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. तिथे जाऊन तपासणी करा आणि तिथे सांगितलेल्या निर्देशांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील जनतेला केले.
कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला: राज ठाकरे
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असल्यामुळे संबंधित व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णालये किंवा दवाखान्यात जाऊ नये. जर तसे केले तर संबंधित रुग्णालये धोक्यात येऊ शकतात. त्यांना सील करावे लागू शकते. त्यामुळे इतर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांवर याचा परिणाम होऊ शकतो. इतर कोणता त्रास असलेल्या रुग्णांनी सामान्य दवाखान्यात जायला हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सार्वजनिक सण, उत्सव, क्रीडा महोत्सव, कार्यक्रम यांना मनाई करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुढील आदेश येईपर्यंत हा मनाई आदेश कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या स्वरुपाच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोविड १९ : वयोवृद्ध रुग्णांवर मुंबईत केवळ मोठ्या रुग्णालयात उपचार
घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने तोंड आणि नाक झाकले जाईल, असा घरगुती तयार केलेला मास्क अवश्य वापरावा. इतरांपासून आवश्यक अंतर राखावे. त्याचबरोबर विनाकारण भाजी घेण्यासाठी गर्दी करू नये. भाजी मंडई दिवसभर उघडी आहे. त्यामुळे उगाचच गर्दी करू नये, अशी विनंती त्यांनी केली.
महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यांतील पाच लाख मजुरांची राहण्याची, दोन वेळच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.