पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस; शाळांना सुटी

मुंबईतील पाऊस

मुंबई शहर आणि उपनगर त्याचबरोबर ठाणे, कल्याण, वसई-विरार, नवी मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईतील जनजीवनावर झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वे प्रवाशांनी याबद्दल माहिती दिली. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूकही सकाळी साडेदहाच्या सुमारास विस्कळीत झाली होती. 

मुंबई आणि रायगडमध्ये येत्या २४ तासांत  अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये अंधेरी सबवे, शीव, दादर, हिंदमाता या ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत पुढे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते आहे. रस्ते वाहतूकही मंदावली आहे.

मंगळवारीही मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. वडाळा, जोगेश्वरी या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 

नवी मुंबईत बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही या काळात १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

गणेश मंडळांना आवाहन

मुंबईत ज्या भागात पाणी साचले आहे. तेथील गणेश मंडळांनी आपल्या मंडळाची वीज तात्पुरती बंद ठेवावी. साचलेल्या पाण्यातून वीज प्रवाह वाहून अपघात होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.