पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत पुन्हा मुसळधार; जागोजागी पाणी साचले, वाहतूक विस्कळीत

पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात (HT photo by Bhushan Koyande)

मुंबईत कार्यालयातून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाने मोठा दणका दिला. सांयकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. जागोजागी मोठ्याप्रमाणात पाणी साचले. पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला. हवामान विभागाने तर पुढील चार तास ठाणे, रायगड आणि मुंबईला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसण्याचा तसेच मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसाचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाला बसला. येथील विमान वाहतून ३० मिनिटे उशिराने उड्डाण करत होती, अशी माहिती विमानतळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिली.

कमी दृश्यमानतेमुळे ९ विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत. 

भांडूपमधील एलबीएस मार्गावर पाणी साचले आहे. मध्य १५ ते २० मिनिटे , हार्बर रेल्वे १५ मिनिटे, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल ५ मिनिटे उशिराने धावत होत्या. मांटुगा, वडाळा, चर्चगेट, दादर, हिंदमाता, वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस पडला. हिंदमाता भागात तर पाणी साचायलाही सुरुवात झाली. सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे चाकरमान्यांचा घरी जाताना चांगलाच खोळंबा झाला. पाणी साचल्यामुळे अनेक भागातील वाहतूक बंद करण्यात आली.

मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी करून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

पावसामुळे पूर्व द्रूतगती मार्गावर घाटकोपर येथे वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मुंबई पोलिसांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन केले आहे. लोकांना अडचणी आल्यास त्यांनी १०० क्रमांकावर अथवा टि्वट करण्याची सूचना केली आहे.