पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबापुरी'

मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे.(फोटो - प्रमोद ठाकूर/ ऋषीकेश चौधरी/ एस.त्रिपाठी)

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते. तो मुसळधार पाऊस अखेर सुरु झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर मुंबईकडे येणारी रस्ते वाहतूक ही अत्यंत धीम्यागतीनं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. वाशी टोलनाक्यावरदेखील  वाहतुकीची कोंडी झाली आहे. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसाने मुंबईचा वेग काहीसा मंदावला असल्याचे दिसते आहे. 

शुक्रवार सकाळपासूनच मुंबईची उपनगरे कांदिवली, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पालघरमध्येही सकाळपासून जोराचा पाऊस पडतो आहे. विरार, वसईमध्येही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ठाण्यामध्येही सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबई आणि उपनगरातील मुसळधार पावसामुळे शहरात तब्बल १०० ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शहर वाहतूक पोलिसांनी एक परिपत्रक जारी करुन चालकांना सूचना दिल्या आहेत. अंधेरी-कुर्ला रोड,  सायन, विक्रोळी मुलुंड आणि पश्चिम द्रुतग्रती मार्गाच्या परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दादर हिंदमाता, सायन रोड क्रमांत २४, वडाळाजवळील जी.डी. आंबेडकर रोड, नायगाव रोड, भांडूप गावचा रस्ता, वडाळा मोनो रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला तरी मुंबईत विशेष पाऊस पडत नव्हता. घामाच्या धारांनी रोजच भिजत असलेल्या मुंबईकरांकडून पावसाची आतुरतेने वाट बघितली जात होती. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरल्याचे दिसून येते आहे. कोकणामध्येही ठिकठिकाणी जोरात पाऊस पडतो आहे. विशेषतः तळकोकणात मालवणमध्ये पावसाचा जोर जास्तच आहे.

जून महिना संपायला आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. पावसाअभावी मुंबईवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खूप कमी झाला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास मुंबईत पाणी कपात करावी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.