पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘गोदरेज प्रॉपर्टीज’नं खरेदी केला आर.के.स्टुडिओ

आर. के. स्टुडिओ

मुंबईतील चेंबूर येथे गेल्या  ७० वर्षांहूनही  अधिक काळ उभा  असलेला आर. के. स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला आहे. शुक्रवारी कंपनीने आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये आरके  स्टुडिओ विकत घेण्याचा मानस  कंपनीनं  कपूर कुटुंबीयांकडे बोलून दाखवला होता. यासाठी २०० कोटी रुपये मोजण्याची गोदरेजची तयारी असल्याचं वृत्त लाइव्ह मिंटनं प्रकाशित केलं होतं.  मात्र अद्यापही  स्टुडिओच्या विक्रीची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

 ‘२.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक आणि आलिशान अशी निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ कंपनीने दिली. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.  त्यातून गेल्यावर्षी  लागलेल्या आगीचा मोठा फटकाही स्टुडिओला बसला. त्यामुळे दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला.

या स्टुडिओशी आमच्या अनेक गोष्टी जोडल्या आहेत. आम्ही ही जागा विकण्याचा निर्णय घेतला यासाठी  आम्ही एकमतानं  गोदरेज प्रॉपर्टीची निवड केली. संपन्न वारसा लाभलेल्या या जागेवर आता नवी वास्तू उभी राहिल असं रणधीर कपूर म्हणाले.