पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी

निधी चौधरी

मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी या आपल्या एका टि्वटमुळे वादात सापडल्या आहेत. आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टि्वटमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकाराचा निषेध करत निधी चौधरी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. ज्या टि्वटमुळे वाद झाला आहे. ते टि्वट चौधरी यांनी काढून टाकले आहे. त्यांनी हे टि्वट १७ मे रोजी केले होते. 

आपल्या वादग्रस्त टि्वटमध्ये चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या तारखेचा उल्लेख करताना मारेकरी नथुराम गोडसे यांचे आभार मानले होते. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, 'आपण महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. देशातील चलनावरुन त्यांचे छायाचित्र हटवण्याची हीच योग्य वेळ आहे. जगभरातील त्यांचे पुतळे हटवायला पाहिजेत. संस्थांची नावे बदलली पाहिजेत. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!' चौधरी यांच्या या टि्वटनंतर सोशल मीडियावर वाद सुरु झाला होता. त्यानंतर त्यांनी हे टि्वट डिलिट केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी केला आहे. महात्मा गांधी यांच्याविरोधात अपमानजनक टि्वट करणाऱ्या निधी चौधरींना तात्काळ पदावरुन निलंबित केले पाहिजे. त्यांनी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले असून हे कदापि स्वीकारले जाणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. 

'काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाही, या निव्वळ अफवा'

दरम्यान, चौधरी यांनी या प्रकरणावर सारवासारव करत आपण महात्मा गांधींच्या विचारांचे पाईक असून त्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे एकामागोमाग एक टि्वट करत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गांधीजींचे 'सत्याचे प्रयोग' हे आपले आवडते पुस्तक असल्याचेही त्यांनी एक टि्वटमध्ये म्हटले आहे. 

निधी चौधरी या २०१२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे. निधी चौधरींच्या टि्वटप्रकरणी सरकारकडून काय निर्णय घेतला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुस्लिम या देशाचे भाडेकरु नाहीतः ओवेसी