पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वायू'मुळे पश्चिम किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाचा अंदाज

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईच्या किनाऱ्यापासून नैऋत्येला ७६० किलोमीटरवर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असून, त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण आणि मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मंगळवारी दुपारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे 'वायू' वादळात रुपांतर होणार असून, यामुळे किनारपट्टीपासून समांतर भागात ताशी ११५ किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग!

हवामान विभागातील अधिकारी ड़ॉ. के. सतीदेवी यांनी सांगितले, कमी दाबाचा पट्टा सध्या पश्चिम किनारपट्टीवरून लांब आहे आणि त्याचा प्रवास उत्तर दिशेने सुरू आहे. हवामान विभाग यावर सतत लक्ष ठेवून आहे. वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. जरी ते धडकले नाही. तरी ते गुजरातच्या किनारपट्टीपासून जवळच असेल आणि त्याचा परिणाम किनारपट्टीवर बघायला मिळेल. या वादळाचा परिणाम मान्सूनच्या पुढील वाटचालीवरही होईल. यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास थोडा लांबणीवर पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एक आठवड्याच्या विलंबानंतर गेल्या शनिवारी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले होते. डॉ. सतीदेवी म्हणाल्या, जेव्हा अशा पद्धतीने तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याची समुद्रात निर्मिती होते. त्यावेळी वारे आणि हवेतील बाष्प त्या दिशेने ओढले जाते. याचा मान्सूनवर परिणाम होतो. वाऱ्याची दिशाच बदलल्यामुळे मान्सूनमुळे पडणारा पाऊस समुद्रात आणि किनारपट्टीच्या भागात कोसळतो.