कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या ठिकाणच्या व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी विधानसभेत जाहीर केले. ३० मार्चला याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूरमध्ये २ तर पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला
नागरिकांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणूनच केवळ या शहरांमधील व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १० वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सध्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे स्वतःहून टाळले पाहिजे. अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
... या देशातील एअर इंडियाची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द
सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात यावे. त्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी विधानसभेत केलेल्या विशेष निवेदनात सांगितले. राज्य सरकार राज्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.