पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्यत काळजीनं आणि गांभिर्याने आपल्याला निवेदन केले आहे. निवेदन ऐकल्यानंतर मी देखील चरकलो. त्यांनी लॉकडाऊनची केलेली घोषणा ही काळजाचा ठोका चुकवणारी आहे. पण कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढेच काही दिवस आपल्याला मोदींनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करावे लागेल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दिलासादायक! कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनामुक्त ८ रुग्णांना डिस्चार्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा देशवासियांना संबोधित केले. धोका लक्षात घेऊन देशवासियांच्या हितासाठी कठोर पाऊल उचलत असल्याचे सांगत त्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करत असल्याचे सांगितले. पुढील २१ दिवस आपल्यातील संयम दाखवत घरात बसून कोरोनाविरोधातील लढा जिंकण्याचा संकल्प करा, असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. मोदींच्या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले की, मोदींनी घोषणा केल्यानंतर मी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही महाराष्ट्रातील जनतेला दिल्या आहेत. याची त्यांना कल्पना दिली. एवढेच नाही तर जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा या सुरुच ठेवाव्या लागतील, असेही त्यांना सांगितले. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
चक्क व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला विवाह!
औषधे, जीवनावश्यक वस्तू यासारख्या सेवा सुविधा या सुरुच राहणार आहेत. संकट गंभीर असून घराबाहेर पडू नये हाच यावर उपाय आहे. संकटाला उंबरठ्यावरुन परत पाठवायचे असेल तर मोदींनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपल्याला या जीवघेण्या रोगाला थोपवावे लागेल. या काळात अन्नधान्याचा साठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारे गोंधळ करु नये. युरोपातील परिणाम आपण पाहिले आहेत. त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही. घरातून बाहेर न पडता संकटाला आपण उंबरठ्यावरुनच परत पाठवायचे आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती राज्यातील जनतेसमोर केली.