पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कस्टोडियनकडून ४ कोटी लंपास, अशी केली चोरी

खासगी कंपनीकडे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम दिले जाते

नवी मुंबईमध्ये एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम करणाऱ्या खासगी कंपनीच्या एका रोखपालाने (कस्टोडियन) वेगवेगळ्या ३५ मशीनमधून ३.९६ कोटींची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी रोखपाल सचिन वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दिलेल्या चावीचा गैरवापर केला आणि त्यातील पैसे चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या चोरीमध्ये कोणत्या बँक अधिकाऱ्याचा संबंध आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.

२६ डिसेंबर २०१९ रोजी ही चोरी उघडकीस आली. त्या दिवशी सचिन वाघ कामावर न आल्यामुळे शंका उपस्थित करण्यात आली. सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे. याच कंपनीमध्ये सचिन वाघ काम करीत आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एक पथक असते. त्यामध्ये दोन रोखपाल, गाडीचा चालक आणि सशस्त्र सुरक्षारक्षक यांचा समावेश असतो. सचिन वाघ यांच्या पथकाकडे कोपरखैरणेमधील ३७ एटीएम्सची जबाबदारी आहे. 

यासंदर्भात सेक्युरिट्रान्स कंपनीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सचिन वाघ हे वरिष्ठ रोखपाल आहेत. त्यांच्याकडे संबंधित एटीएमच्या चाव्या आणि ऍडमिन कार्ड आहे. त्या एटीएममध्ये किती पैसे भरले आणि काढले याची माहिती त्यांच्याकडे असते.

राजस्थानात १०० बालकांचा मृत्यू; मायावतींची काँग्रेस, प्रियांकांवर टीका

एटीएममध्ये पैसे भरण्याच्या आदर्श पद्धतीनुसार संबंधित कंपनीच्या तिजोरीतून पैसे घेतल्यावर ते मोजून सुरक्षितपणे कंपनीच्या गाडीमध्ये ठेवले जातात. दोन रोखपालांपैकी एकाकडे चाव्या आणि दुसऱ्याकडे पासवर्ड असतो. या दोघांपैकी वरिष्ठ व्यक्ती एटीएमच्या खालच्या भागात असलेली तिजोरी उघडतो. त्यामध्ये किती पैसे भरले, कोणत्या रकमेच्या नोटा भरल्या याची माहिती वरिष्ठ रोखपाल बँकेच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये अपडेट करतो. 

२६ डिसेंबरला सचिन वाघ अचानक कामावर न आल्याने त्याच्यासोबत काम करणारा दुसरा रोखपाल प्रसाद परब याला कंपनीने त्याच्या घरी पाठवले. सचिनच्या कुटुंबियांनी तो नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजताच कामावर गेल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार समोर आल्यावर सेक्युरिट्रान्सच्या व्यवस्थापनाला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्यानंतर या पथकाकडून ज्या एटीएममध्ये पैसे भरले जातात त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ११ ते १३ डिसेंबर या काळात एकूण ३.९६ कोटी रुपये एटीएममध्ये भरलेच नसल्याचे लक्षात आले. एकूण ३५ एटीएममध्ये मिळून ही रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली.

तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही: रामदास आठवले

नवी मुंबई पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.