पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेला हवी आहे बच्चन यांची 'दीवार'

Amitabh Bachchan, Prateeksha bungalow

जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी  अमिताभ बच्चन यांचा 'प्रतीक्षा' बंगला आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील सात ते आठ फूट जागा महापालिकेने मागितली आहे.  बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्या शेजारी  असणाऱ्या  उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील जमिनीचा भाग  पालिकेनं आता ताब्यात घेतला आहे. 

जुहू येथील एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर नेहमी वाहतूककोंडी होते. वाहतूक कोंडीचा त्रास  हा  स्थानिकांना तसेच पादचाऱ्यांना सहन करावा लागतो . त्यामुळे पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. सध्या हा रस्ता ४५ फुट लांब आहे. त्याचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.  के. व्ही. सत्यमूर्ती यांनी नोटीस मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने स्थगिती आदेश न दिल्यामुळे पालिकेने 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. 'पालिका आमच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. त्यांनी  बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत अजूनही पाडली  नाही. मात्र माझ्या बंगल्याच्या आवारातील भिंत पाडण्यास  सुरूवात केली.  असं करून त्यांना बच्चन यांच्यावर दबाव टाकायचा आहे', अशी प्रतिक्रिया के. व्ही. सत्यमूर्ती यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे रस्त्याची रुंदी ही ६० फूट आहे, आम्ही पालिकेला याचा पुरावाही दिल्याचं सत्यमूर्ती म्हणाले. 

तर बच्चन यांनी पालिकेच्या नोटीसीला कोणतंही  उत्तर दिलं नाही. काही वर्षांपूर्वी सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या जागी बंगला होता. या बंगल्याचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी जागा सोडण्याची अट घालण्यात आली होती. त्या बदल्यात चटईक्षेत्राच्या रूपात सत्यमूर्ती रेसिडन्सीसाठी लाभही देण्यात आला होता. आता सात मजली इमारत उभी राहिली, मात्र रस्त्यासाठी जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतीला निवासी दाखलाही मिळू शकलेला नाही. ही इमारत जंक्शन परिसरात आहे. रस्ता ६० फूट रुंद करण्यात आला असला, तरी जंक्शनवर थोडी अधिक जागा लागते. त्यामुळे सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागेची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे आम्ही बच्चन यांच्या  बंगल्याची जागाही रस्ता रुंदीकरणासाठी लवकरच घेणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी हिंदूस्थान टाइम्सला दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bmc soon turn towards the Bachchan bungalow boundary wall may demolished for widening the adjoining Sant Dnyaneshwar Marg