पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर; २ हजार ९४४ कोटींची तरतूद

शैक्षणिक अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने २०२०-२१चा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. २९४४.५९ कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सहआयुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांना सादर केला. यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात २१०.८२ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शिक्षण विभागाने २७३३.७७ कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला होता. 

शैक्षणिक अर्थसंकल्प २०२०-२१वर एक नजर - 

- मुंबई महानगरपालिका आयसीएससी आणि सीबीएसई शाळा सुरु करणार. वूलन मिल महापालिका येथे आयसीएसई शाळा, पूनमनगर महापालिका येथे सीबीएसई शाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार.

- विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाच्या अनुभवासाठी महापालिकेच्या विज्ञान कुतूहल केंद्रामध्ये डिजिटल दुर्बिण बसवून छोटी वेधशाळा स्थापन करणार. यासाठी २६ लाखांची तरतूद. 

- दहावीच्या परीक्षेत प्रथम २५ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर पालिकेतर्फे पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ५० लाखांची तरतूद.

- तात्पुरत्या सेवानिवृत्तीवर असलेल्या शिक्षकांना ११ दिवसांसाठी नियुक्त करता येण्याचा अधिकार शाळेच्या प्रमुख शिक्षकांना देण्यासंदर्भात महापालिकेने प्रस्ताव मांडला. तसेच १०,००० पर्यंतचे बिल प्रमाणित आणि मंजूर करण्याचे अधिकार देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेकडून २० कोटींची तरतूद  

- व्हर्च्युअल क्लासरुमसाठी प्राथमिक शाळांसाठी ७.२१ कोटींची तरतूद.

- व्हर्च्युअल क्लासरुमसाठी माध्यमिक शाळांसाठी ४.३८ कोटींची तरतूद.

- शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा प्रवास देण्यात येत आहे. ४७,२०३ विद्यार्थी याचा लाभ घेत होते. यावर्षी प्राथमिक विभागासाठी १४.३५ कोटींची तरतूद तर माध्यमिक विभागासाठी ३.३४ कोटींची तरतूद.

- शिक्षण विभागामार्फत १२१४ वर्गखोल्यांमध्ये डिजिटल क्लासरूम उभे करण्यात आले आहेत. २०२०-२१ मध्ये आणखी १३०० डिजिटल वर्ग तयार करण्याची प्रशासकीय मान्यता सुरू.  या वर्ष भरात काम पूर्ण करणार. प्राथमिक विभागासाठी २५ कोटी तर माध्यमिक विभागासाठी ४ कोटींची तरतूद.

- विद्यार्थ्यांना आजारांवर आळा घालण्यासाठी हॅण्ड सॅनिटायजर बसविणार.

- महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय उपयोगी साहित्य गणवेश मोफत वाटप करणार. प्राथमिक शाळांसाठी ८०.६४ कोटी आणि माध्यमिक शाळांसाठी ३१.१८ कोटींची तरतूद.