पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? शक्य की अशक्य...

शरद पवार आणि नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चर्चा - विचार विनिमय सुरू आहे. तिन्ही पक्ष मिळून किमान समान कार्यक्रम तयार करण्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आमची शिवसेनेशी कोणतीच चर्चा सुरू नसल्याचे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आम्ही आणि काँग्रेस एकत्र मिळून लढलो आहोत आणि शिवसेना-भाजप एकत्र लढले आहेत त्यामुळे त्यांचे त्यांना विचारा, असे शरद पवार सोमवारी दुपारी म्हणाले होते. एकीकडे हे सगळे घडले असतानाच दुसरीकडे राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. या दोन्ही पक्षांचे सदस्य कधीही वेलमध्ये (अध्यक्षांसमोरील रिकामी जागा) उतरले नाहीत. ते त्यांचे मुद्दे प्रभावीपणे मांडतात पण त्यासाठी वेलमध्ये कधीही येत नाहीत. त्यांच्याकडून सर्वांनी शिकले पाहिजे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दबक्या आवाजात का होईना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?, शिवसेनेचा सवाल

'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भाजपच्या एका नेत्याने हे शक्य असल्याचे म्हटले आहे. भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकते. त्यासाठी दिल्लीतील पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवारांशी चर्चा करू शकतात. १०५ जागा जिंकल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार स्थापन करता आली नाही तर भाजपवर मोठी नामुष्की ओढावू शकते. शरद पवार आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी प्रचारावेळी एकमेकांवर टीका केली असेल. पण त्यांच्यातील मैत्रीचे नाते चांगले आहे. त्यामुळे काही अटींवर शरद पवार भाजपला पाठिंबा देऊ शकता. भाजपसुद्धा आक्रस्ताळेपणा करणाऱ्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्य देऊ शकतो, असेही हे नेते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेले कौतुक सूचक आहे. त्यातून दोन्ही पक्ष एकत्र येण्याला वाव असल्याचे दिसते आहे, असेही हे नेते म्हणाले. 

दुसरीकडे ईडीच्या खटल्यांच्या माध्यमातूनही भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकला जाऊ शकतो. प्रफुल पटेल यांच्याविरोधातील खटल्याचा भाजपकडून वापर करून घेतला जाऊ शकतो, असे एका राजकीय विश्लेषकाने म्हटले आहे.

भाजपच्या अन्य एका नेत्याने सांगितले की, शिवसेनेसोबत जाण्यावरून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये अद्याप सहमती नाही. त्यामुळे हीच स्थिती आणखी दोन महिने कायम राहिल्यास शरद पवार मागच्या वेळेप्रमाणे भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असे या नेत्याने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभाही होणार नाही. पण भाजपला बाहेरून पाठिंबा दिला जाईल, असे या नेत्याने सांगितले.

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी म्हटले आहे की, जर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला तर तो पक्षच संपेल. शरद पवार आपली विश्वासार्हता गमावून बसतील. त्यामुळे शरद पवार आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून शिवसेनेकडून आपल्या जास्तीत जास्त अटी मान्य करून घेण्याची शक्यता जास्त आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी दोन्ही नेत्यांचे याबद्दल एकमतच असावे, असेही ते म्हणाले.

(हिंदुस्थान टाइम्सच्या प्रतिनिधी केतकी घोगे यांच्या वृत्तावर आधारित)