पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा; राज ठाकरेंचे आदेश

राज ठाकरे

लोकसभा निवडणूक न लढवताही आपल्या सभांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील प्रचारावेळी नव्या पद्धतीने सभांचे आयोजन करून आणि जमलेल्या नागरिकांना व्हिडिओच्या माध्यमातून परिस्थिती काय असल्याचे दाखवून राज ठाकरे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. 'ए लाव रे तो व्हिडिओ' हा हॅशटॅग त्यावेळी महाराष्ट्रात चर्चेत आला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे त्याच्या तयारीला राज ठाकरे यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचा. लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. आपल्या पक्षाचे नाव खराब होईल, असे कोणतेच कृत्य करू नका, असे आदेश राज ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

सरकारला फसवायचंच होतं, मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंची टीका

सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. पण गेल्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत एकदम घसरण झाली. मनसेचा केवळ एकच आमदार विजयी ठरला होता. जुन्नरमधून शरद सोनावणे विजयी झाले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनीही मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सध्या विधानसभेत मनसेचा एकही आमदार नसल्याचे चित्र आहे.

कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यापैकी एक राज्यातील दुष्काळाचा आणि दुसरा आगामी विधानसभा निवडणुकीचा. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा आपण करणार नाही. तो काही टूरिस्ट स्पॉट नसल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्तांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्याच्या पदावर मी नाही. त्यामुळे नुसते तिथे जाऊन काय होणार, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार का, या प्रश्नावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After Lok Sabha polls MNS chief Raj Thackeray asks workers to get ready for Maharashtra elections