पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून जाण्याची शक्यता

महाराष्ट्र काँग्रेस

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव नाही. एकीकडे लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नसून, दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पाच आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसेल, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या आणखी दोन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे

विधानसभेतील काँग्रेसचे सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नीतेश राणे आणि जयकुमार गोरे हे या आठवड्यात काँग्रेसला रामराम करतील, अशी माहिती मिळते आहे. त्यापैकी काही जण लगेचच भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षांतरविरोधी कायद्याप्रमाणे यांना आमदारकी सांभाळून दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा दिला जाईल आणि ते पक्षातून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. येत्या चार महिन्यांतच राज्यात विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे लगेचच या ठिकाणी पोटनिवडणूक होणार नाही. असे झाल्यास विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ४२ वरून थेट ३७ पर्यंत खाली येईल. त्यानंतर विधानसभेत ४१ सदस्य असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख विरोधी पक्ष होईल आणि त्यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाईल.

सध्या स्वस्तात गृहकर्ज देत असलेल्या १० बँका

दरम्यान, राष्ट्रवादीकडून या स्थितीतही लगेचच विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली जाणार नाही, असे आम्हाला वाटते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जरी आमच्यापेक्षा जास्त आमदार राहिले, तरी ते लगेचच विरोधी पक्षनेतेपद मागणार नाहीत. 

सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे ही जागा रिक्त आहे. पण आगामी अधिवेशनात ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देऊन पक्ष सोडल्यास विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला विरोधी पक्षनेतेपद देईल, हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After Lok Sabha poll results Congress may lose Leader of Opposition post in Maharashtra assembly