पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा

उर्मिला मातोंडकर

पक्षांतर्गत वादाचा काँग्रेसमध्ये आणखी एक बळी गेला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येऊन भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकरांनी आज (मंगळवार) काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील वादामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले असताना मातोंडकर यांच्या राजीनाम्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकरांनी उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काम केले नसल्याचे पत्र वरिष्ठांना दिले होते. त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदे दिली जात असल्याची त्यांची भावना होती. त्यांनी अखेर पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या मनातील खदखदीला वाट मोकळी करुन दिली. माझी ताकद ही पक्षासाठी वापरण्याऐवजी पक्षांतर्गत वादातच वाया जात असल्याचे त्यांनी म्हटले. 

'घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका, देतो राजीनामा...'

लोकसभा निवडणुकीत त्यांनी गोपाळ शेट्टी यांना काट्याची टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी राजकीय परिपक्वता दाखवली होती. त्यामुळे पराभवानंतरही त्यांना काँग्रेसमध्ये उज्ज्वल भविष्य आहे, असे बोलले जात होते. पक्षांतर्गत वादाचा अखेर त्या बळी पडल्या. 

विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केल्यानंतर संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे मुंबई काँग्रेसचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला होता.