पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भिवंडी येथे चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, ५ जण जखमी

भिवंडी येथील शांती नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली (ANI)

भिवंडी येथील शांती नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ ते ५ व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. ही इमारत ८ वर्षे जुनी असून अनाधिकृतरित्या बांधण्यात आल्याची माहिती भिवंडी महापालिका आयुक्त अशोक रणखांबे यांनी 'एएनआय'ला सांगितले. दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 

शांती नगर परिसरात दुर्घटनाग्रस्त इमारत ८ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. इमारत उभारताना निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्याचे सांगण्यात येते. इमारतीच्या कॉलमला तडे गेले होते. त्यानंतर इमारतीत राहणाऱ्या लोकांनी आपले साहित्य काढण्यास सुरुवात केली होती. त्याचदरम्यान ही इमारत कोसळल्याचे सांगितले जाते. 

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल, एनडीआरएफचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यांना ४ ते ५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, महापालिका आयुक्त अशोक रणखांबे यांनीही घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. ते म्हणाले की, इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यावेळी ही इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने आम्ही संपूर्ण इमारत रिकामी केली होती. पण काही लोक आमची परवानगी न घेता इमारतीत घुसले. त्याचवेळी ही इमारत कोसळली. ४ जणांना वाचवण्यात आले आहे. ही इमारत ८ वर्षांपूर्वीची असून ती अनाधिकृत आहे. याबाबत चौकशी केली जाईल.