ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत-yugendra pawar to fight assembly election from baramati against ajit pawar see what jayant patil said at solapur rally ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत

ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत

Aug 12, 2024 04:14 PM IST

Jayant Patil on Baramati Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उतरवण्याचं शरद पवार यांच्या पक्षानं जवळपास निश्चित केलं आहे.

ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत

Jayant Patil on Baramati Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लक्षवेधी लढत महाराष्ट्रानं पाहिल्यानंतर आता बारामती विधानसभेसाठी पवारांच्या कुटुंबातच सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे जाहीर संकेत दिले आहेत. त्यानुसार, युगेंद्र पवार हे अजित पवार यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. याच यात्रेचा भाग म्हणून बारामती इथं काल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य केलं.

बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार हेच लढवतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. त्यांनी युगेंद्र पवारांचं कौतुक केलं. 'युगेंद्र पवार हे अलीकडं राजकारणात रस घेऊ लागले आहेत. पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडं फिरू लागले आहेत. तरुण नेतृत्वाला कसा पाठिंबा मिळू शकतो हे युगेंद्रदादांच्या रुपानं आपण गावागावांत बघतो. ते जिथं-जिथं जातायत, तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढं येत आहेत. सार्वजनिक जीवनात युगेंद्रदादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून कार्यकर्तेही त्यांना साथ देत आहेत. बारामती विधानसभेचं भविष्य नव्या रक्ताकडे, नव्या हातात देण्याची उत्सुकता सर्वांना दिसेतय. हे कामही सगळे कार्यकर्ते योग्य पद्धतीनं करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पहिला सामना मोठ्या पवारांनी जिंकला!

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं होतं. संपूर्ण निवडणूक प्रचार काळात त्यांनी बारामतीमध्ये तळ ठोकला होता. मात्र, सुप्रिया सुळे या तब्बल दीड लाखांच्या मताधिक्यानं निवडून आल्या. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना कोंडीत पकडण्याची रणनीती शरद पवारांच्या पक्षानं आखली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवारांचे नातू युगेंद्र यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप झालं नसल्यानं जयंत पाटील यांनी थेट उमेदवारी जाहीर करणं टाळलं असलं तरी संकेत मात्र देऊन टाकले आहेत.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे ते खजिनदार आहेत. तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीमधील सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्यानंतर श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार हे मोठ्या पवारांसोबत राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत बारामती विधानसभेत सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळाली होती. तेव्हापासूनच युगेंद्र पवार यांचं नाव तिथल्या उमेदवारीसाठी चर्चिलं जात आहे.