प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कितीही मोठ्या संकटावर मात करू शकतो, याची प्रचिती नुकतीच गडचिरोली जिल्ह्यात पहायला मिळाली. रविवारपासून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसतोय. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सर्वत्र भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुक्यात गुंडुनूर येथे दोन तरुण एका छोट्या बोटीच्या सहाय्याने नाला ओलांडत होते. बोट थोडे अंतर गेल्यानंतर पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अचानक जोरजोरात हेलकावे खाऊ लागली. आणि अखेर बोट उलटली. त्यातला एक जण पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने पोहत कसाबसा नाल्याचा किनारा गाठला. मात्र दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.
दरम्यान, गुंडेनूरच्या नाल्यात दलसू पोताडी नावाचा तरुण वाहून गेला असल्याची वार्ता परिसरात सर्वत्र पसरली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका हा सर्वात दुर्गम मानला जातो. येथे अनेक ठिकाणी अखंड मोबाइल नेटवर्क किंवा विजेची उपलब्धता नसते. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी सगळीकडे धावाधाव सुरू केली. दोन रात्री आणि एक दिवस असे तब्बल ३६ तास उलटल्यानंतर मुसळधार पावसाचा जोर थोडा ओसरला आणि तरुणाचा शोध घेण्यासाठी गावकरी नाल्याच्या परिसारत वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी निघाले. वाहून गेलेला तरुण जीवंत असण्याबद्दल काहींना शंका वाटू लागली होती. अशातच शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना नाल्याच्या मधोमध असलेल्या एका झाडावरून आवाज ऐकू आला. तिकडे जाऊन पाहिल्यानंतर वाहून गेलेला तरुण झाडाच्या फांदीवर बसलेला गावकऱ्यांना आढळला. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण तब्बल ३६ तास झाडाच्या फांदीवर बसून राहिल्याचे दिसून आले. आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, गावकऱ्यांनी लगेच नाल्याकाठच्या इतर झाडांना दोरखंड बांधून दलसू पोताडीला सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या दुर्गम आदिवासी भागात नद्या नाल्यांना दरवर्षी मोठा पूर येत असतो. अशावेळी पुरात अडकलेल्यांचा बचाव करण्यासाठी या भागात कोणतीही सरकारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.