पुणे : पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन बहीणींचा सेल्फी घेतांना पाय घसरून पाण्यात पडल्या. यावेळी दोन बहिणींना वाचवण्यासाठी भावाने कोणताही विचार न धरणात तरुणाने उडी मारली. त्याने बहीणींना वाचवले. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८, रा. खराडी) असे धरणात बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हा मित्र मैत्रिणीसोबत पानशेत धरण परीसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांची बहीण अनुसया बालाजी मनाळे आणि मयुरी देखील सोबत होत्या. अनुसया ही फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पाण्याला वेग असल्याने ती वाहून जात होती. तिला वाचविण्यासाठी मयुरी पाण्यात उतरली. पाण्याला वेग असल्याने मयुरी बुडाली. अनुसया आणि मयुरीला वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने पाण्यात उतरला पाण्याला वेग असल्याने ज्ञानेश्वर बुडाला. ज्ञानेश्वरबरोबर असलेल्या मित्रमैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. अनुसया आणि मयुरी यांना वाचविण्यात यश आले. मात्र, ज्ञानेश्वर पाण्याचा वेगात वाहून गेला.
त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांना आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. ज्ञानेश्वरचा पाण्यात शोध घेतला जात असतांना त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी नदी आणि धरणाजवळ फिरायला जाताना पाण्याच्या कडेला जाऊ नये. जर पोहायला येत नसेल तर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, फिरायला जाताना काळजी घेऊन जावे, असे आवाहन केले आहे.