Latur Man Dies By Suicide: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात चांगलीच ठिणगी पडली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने संबंधित तरुणाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले आहे.
रमेश चंद्रकांत फुले (वय, ३६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश हा लातूर येथील आष्टी गावातील रहिवासी आहे. घरप्रपंच भागविण्यासाठी रमेश दुसऱ्याच्या शेतात मंजुरी करायचा. सत्तेत आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ असे अश्वासन देण्यात आले होते. परंतु. सत्तेत आल्यानंतरही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे, अशी भावना रमेश नेहमीच व्यक्त करायचा. धनगरांना एसटी आरक्षण मिळाल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील, असे रमेश फुले यांना वाटत होते. मात्र, अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, या नैराश्यातून रमेशने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या घेतली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रमेशचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
दरम्यान, रविवारी रमेश कामानिमित्त घराबाहेर पडला. परंतु, रात्री उशीर होऊनही तो घरी परतला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आत्महत्या केल्याच निरोप घरच्यांना मिळाला. मयत रमेश फुले यांचे इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्या पश्चाता पत्नी, दोन मुली, मुलगा, आई- वडील, भाऊ- भावजय, पुतणे असा परिवार आहे.