Indapur Murder : पिंपरी-चिंचवड येथील सराईत गुंड हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे थांबला असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत खुर्चीत बसलेल्या सराईत आरोपीच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना शनिवारी रात्री घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवना केले आहे. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे.
अविनाश बाळू धनवे (वय ३०, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, पिंपरी-चिंचवड) असे हत्या करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड शहरात ६ ते ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री अविनाश हा कारमधून इंदापूर येथे गेला होता. रात्री ८ च्या सुमारास येथील हॉटेल जगदंबमध्ये जेवण करण्यासाठी तो थांबला होता. मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसला असतांना, काही हल्लेखोरांनी पाठीमागून येत अविनाशवर गोळ्या झाडत त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश धनवेवर दबा धरून बसलेल्या ६ ते ७ जणांनी हल्ला करत त्याची हत्या केली. ही घटना जुन्या वादातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी ही हत्या अतिशय नियोजन करून केली. हत्या केल्यानंतर आरोपी हॉटेलबाहेर असलेल्या त्यांच्या कार मधून फरार झाले. ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये असलेल्या सिसिटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली. देशमुख यांनी हल्लेखोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या असून पोलिसांनी पथके रवाना केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.