Mantralaya Crime News Marathi : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच आता मंत्रालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील एका तरुणाने स्वत:वर धारदार ब्लेडनं वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित तरुण कर्जबाजारीपणाला कंटाळलेला असून मदतीच्या मागणीसाठी तो मंत्रालयात आला होता. सुरेश जगताप असं तरुणाचं नाव असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर सुरेश याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं संपूर्ण मंत्रालयात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून जखमी सुरेश जगतापला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या सुरेश जगताप या तरुणाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जबाजारीपणामुळं सुरेश जगतापने मंत्रालयात येवून टोकाचं पाऊल उचचलं आहे. मंत्रालयात जाण्याचा पास घेऊन गेलेल्या सुरेशने सहाव्या मजल्यावरील फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील लॉबीत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेची माहिती समजताच स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्यानंतर आता मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आरोपी सुरेश जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश जगताप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याने त्याच्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. परंतु तो जसाच उपमुख्यमंत्र्यांच्या कार्याबाहेर आला, तर त्याने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सुरेश जगतापने कटरने स्वत:च्या डाव्या मनगटावर वार केले असून त्याला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. त्यानंतर आता पोलिसांनी त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केलं आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
संबंधित बातम्या