Pune Uttam nagar murder : पुण्यात हत्यासत्र सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात चार जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटना ताज्या असतांना उत्तमनगर येथे चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून एकाने एका तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर बोलावून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमित सुदाम गुजर (वय २१, रा. मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला उत्तम नगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप हा रविवारी दुपारी घरी झोपला होता. यावेळी त्याचा मित्र व आरोपी अमित हा जयदीपचया घरी आला. यावेळी त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे. माझ्यासोबत चल’, असे म्हणत त्याने जयदीपला बाहेर बोलावले. जयदीप देखील मदत करण्याच्या हेतूने घराबाहेर गेला. मात्र, अमितने जयदीपचया डोक्यात कोयत्याने वार केले. जयदीपच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरचे बाहेर गेले. तो पर्यन्त आरोपी फरार झाला होता. जयदीपला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना, सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता, त्याने चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून जयदीपचा खून केल्याची कबुली दिली आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी नाना पेठेत खून झाला. त्यानंतर गुलटेकडीत एका तरुणची घरात घुसून हत्या करण्यात आली. तर रविवारी दारू पिऊन त्रास देत असल्याने महिलेने पतीच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर आता उत्तम नगर येथे जयदीप या तरुणाची हत्या करण्यात आली.