Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू असतानाच नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातल्या कामारी या गावात ही घटना घडली आहे. सुदर्शन देवराये असं आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील कामारी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही लोकांनी आंदोलन सुरू केलं होतं. परंतु आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने निराश झालेल्या तरुणाने घरी जावून गळफास घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच सुदर्शन देवराये या तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेनंतर गावातील आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. याशिवाय कामारी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उपोषणकर्त्यांच्या पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील अनेक शहरांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे लोण पसरले होते. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मराठा संघटनांनी उपोषण करत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.